चामोर्शीच्या रूग्णालयात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:07 AM2017-09-27T00:07:01+5:302017-09-27T00:07:33+5:30
चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी तालुका हा लोकसंख्या व भौगोलिकादृष्ट्या विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे या तालुक्यात विविध आजारांच्या रूग्णांची संख्या मोठी असते. मात्र स्थानिक ग्रामीण रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.
नागरिकांच्या तक्रारीवरून नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी सदर रूग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे उघड झाले. चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, आरोग्य व स्वच्छता सभापती विजय शातलवार यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली. यावेळी औषध व गोळ्यांचा तुटवडा असल्याचे दिसून आले. तसेच शूगर तपासणीसाठी लागणारे ग्लुकोज ट्रीप गेल्या अनेक दिवसांपासून येथे उपलब्ध नाही. त्यामुळे शूगरच्या रूग्णांना तपासणी न करता आल्यापावली परत जावे लागत आहे.
चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात दररोज जवळपास ३०० रूग्णांची बाह्य रूग्ण विभागात नोंदणी होत असेते. त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. मात्र येथे औषध व ग्लुकोज ट्रीपचा तुटवडा असल्याने रूग्णांना खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी सर्वसामान्य रूग्णांवर आर्थिक भूर्दंड बसत आहे. आरोग्य विभागातर्फे चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात तत्काळ औषधांसह ग्लुकोज ट्रीपचा पुरवठा करावा, अशी मागणी नगराध्यक्ष वायलालवार, उपाध्यक्ष नैताम व सभापती शातलवार आदींनी केली आहे. यावेळी त्यांनी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. शेखर दोरखंडे यांच्याशी चर्चा केली.
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम
चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी येणाºया रूग्णांची संख्या मोठी आहे. मात्र या रूग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून वैैद्यकीय अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, गंभीर रूग्णांवर येथे योग्य उपचार होत नसल्याने असे रूग्ण गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर करण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली आहे. मात्र याकडे आरोग्य विभागासह शासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे.