अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्या गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:29 AM2018-04-19T01:29:51+5:302018-04-19T01:29:51+5:30
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची तपासणी करण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या विविध योजनांची तपासणी करण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जोमाने तयारीला लागली आहे. काही सदस्य गुरूवारी तर काही शुक्रवारी गडचिरोलीत दाखल होत आहेत.
आ.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एकूण १५ आमदार आणि पाच अधिकारी राहणआर आहेत. १५ आमदारांपैकी ११ विधानसभेचे तर ४ विधान परिषदेचे सदस्य आहेत. विधानसभा सदस्यांमध्ये डॉ.उईके यांच्याशिवाय प्रभुदास भेलावेकर, पास्कल धनारे, संजय पुराम, डॉ.पंकज भोयर, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, अमित घोडा, गोपीकिसन बाजोरिया, वैभव पिचड व पांडुरंग वरोरा तर विधान परिषद सदस्यांमध्ये आनंद ठाकूर, डॉ.संतोष टारफे, चंद्रकांत रघुवंशी, श्रीकांत देशपांडे आदींचा समावेश आहे.
प्रत्येक सदस्यांची खास बडदास्त ठेवण्यासाठी एकेका अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हे सदस्य तीन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शासनाच्या योजनांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली याची तपासणी करतील. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांपासून विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी या समितीच्या तावडीत सापडणार नाही याची दक्षता घेताना दिसत आहे. या समितीला एखाद्या कर्मचाऱ्यांला जागेवरच निलंबित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे कामचुकार कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात काही ठिकाणी भेटी दिल्यानंतर नोंदविलेल्या निरीक्षणांच्या आधारे ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेईल.