लेडी ड्रायव्हर किरण इंग्लंडला, वैभव सोनकुसरे जाणार ऑस्ट्रेलियाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:02 PM2023-09-05T12:02:53+5:302023-09-05T12:04:25+5:30
दुर्गम भागातील दोघांना शिष्यवृत्ती
गडचिरोली : अखेर सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील किरण कुर्मा व वैभव सोनकुसरे या दोन विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाने विदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. किरण ही इंग्लंड व वैभव हा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणार आहे. विशेष म्हणजे, 'लोकमत'ने २८ ऑगस्ट रोजी याबाबत वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर, ३० ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे.
रेगुंठा येथील किरण कुर्मा हिने लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ लिइस येथे इंटरनॅशनल मार्केटिंग अॅन्ड मॅनेजमेंट या एक वर्षीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. शिष्यवृत्तीशिवाय परदेशात शिकणे कठीण असल्याने, तिने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिच्या अर्जावर अभिप्राय लिहून शिष्यवृत्ती मंजूर करण्याची शिफारस केली. मात्र, महिनाभराचा कालावधी उलटूनही मंत्रालयात शिष्यवृत्तीची फाइल अडकली होती. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे विदेशातील कॉलेज सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. उशिरा शिष्यवृत्ती मंजूर झाल्यास विद्यार्थ्यांचे कॉलेज बुडेल, याबाबतचे वृत्त 'लोकमत'ने २८ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले.
पाठपुराव्याला यश
समाज कल्याण विभागाचे गडचिरोलीचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर, शासनाने ३० ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यात राज्यातील ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली.