शिष्यवृत्ती घोटाळा : अॅस्पायर कॉलेजच्या संचालकाचे ‘सीआयडी’पुढे आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 07:36 PM2018-02-22T19:36:56+5:302018-02-22T19:37:41+5:30
दूरस्थ शिक्षण अभ्यासकेंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांच्या खोट्या अॅडमिशन दाखवून शिष्यवृत्ती व इतर लाभ लाटणा-या अॅस्पायर कॉलेजच्या संचालकाने अखेर नागपूरमध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांपुढे आत्मसमर्पण केले.
गडचिरोली : दूरस्थ शिक्षण अभ्यासकेंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांच्या खोट्या अॅडमिशन दाखवून शिष्यवृत्ती व इतर लाभ लाटणा-या अॅस्पायर कॉलेजच्या संचालकाने अखेर नागपूरमध्ये राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिका-यांपुढे आत्मसमर्पण केले. शाहबाज हैदर (३९) रा.चंद्रपूर असे त्याचे नाव आहे. गडचिरोली न्यायालयाने गुरूवारी त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
वर्ष २०१२-१३ या आर्थिक वर्षात झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली शहरातील अॅस्पायर कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी या दुरस्थ अभ्यास केंद्राने ५८ विद्यार्थ्यांचे बनावट कागदपत्रे जोडून शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम मिळून १८ लाख ७२ हजार ४९० रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहे. अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखविण्यासाठी ५८ विद्यार्थ्यांच्या अर्जावर खोटे फोटो लावले होते. त्या फोटोमधील व्यक्तींचा शोध सीआयडी गेल्या तीन महिन्यांपासून घेत आहे.
चंद्रपूर येथील संस्थेमार्फत चालविणाºया जाणाºया अॅस्पायर कॉलेजचे हे दूरस्थ शिक्षण केंद्र गडचिरोलीतील शिवाजी महाविद्यालयात सुरू असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तिथे तसे कोणतेही अभ्यास केंद्र नसल्याचे सीआयडीच्या अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणात आणखी काही लोकांच्या अटकेची शक्यता आहे.
पीसीआरमध्ये पुढे येणार आणखी नावे
गडचिरोलीत अॅस्पायर कॉलेजच्या नावावर कागदोपत्री अभ्यास केंद्र चालविणाºया आरोपी शाहबाज हैदरच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन नाकारत आत्मसमर्पणाचा आदेश दिल्यानंतर त्याने बुधवारी नागपूरमध्ये सीआयडीपुढे आत्मसमर्पण केले. गुरूवारी गडचिरोली न्यायालयापुढे हजर केल्यानंतर तीन दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यात हा घोटाळा नेमका कशा पद्धतीने केला आणि त्यात आणखी कोण-कोण कशा पद्धतीने जुळले आहेत हे पुढे येऊ शकते.