मालवाहू वाहनातून आणले शाळकरी मुला-मुलींना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:51 AM2018-03-04T00:51:36+5:302018-03-04T00:51:36+5:30

School children and girls brought from cargo vehicle | मालवाहू वाहनातून आणले शाळकरी मुला-मुलींना

मालवाहू वाहनातून आणले शाळकरी मुला-मुलींना

Next
ठळक मुद्देशिक्षक म्हणतात, पोलिसांनीच पाठविल्या गाड्या

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : एरवी लग्न वऱ्हाड असो की कोणताही कार्यक्रम, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करताना कोणी दिसल्यास पोलीस त्यांना अडविल्याशिवाय राहात नाही. शनिवारी मात्र उलटेच चित्र गडचिरोलीत पहायला मिळाले. अहिंसा संदेश वाचनाच्या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी चक्क ट्रक, मिनी ट्रक, मेटॅडोअर अशा मालवाहू वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना आणण्यात आले. एवढेच नाही तर काळी-पिवळी जीप व इतर अनेक प्रवासी वाहनांमधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक संख्येने विद्यार्थ्यांना कोंबून प्रवास घडविण्यात आला.
तब्बल ७ हजार श्रोत्यांपैकी ९० टक्के श्रोते विद्यार्थीच होते. जिल्ह्याच्या बहुतांश भागातून शाळकरी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला आणण्यासाठी पोलीस, सीआरपीएफची वाहने लावण्यात आली होती. पण ती मोजकीच असल्यामुळे ज्या शाळांकडे स्वत:च्या स्कूल बस आहेत त्यांनी त्या बसेसने विद्यार्थ्यांना आणावे असे ठरून त्यांच्या डिझेलचे पैसे पोलीस विभागाकडून देण्याचे ठरले. मात्र अनेक शाळांकडे स्कूल बसेसही नसल्यामुळे त्यांच्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था पोलीस विभागाने केली.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित पोलीस ठाण्यांना वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र काही ठाण्यांनी चक्क आपल्या हद्दीत चालणाऱ्या काळी-पिवळी गाड्या, मालवाहू गाड्यांच्या मालकांना त्यांची वाहने विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी भाड्याने मागितली. दुसरी वाहनेच उपलब्ध नसल्यामुळे नाईलाज म्हणून या वाहनांमधून विद्यार्थ्यांची व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत आलेल्या काही शिक्षकांनी वाहनांबाबत विचारले असता, पोलिसांनी जी वाहने पाठविली त्या वाहनातून आम्ही आलो, ती वाहने आम्ही बुक केलेली नव्हती, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा पोलीस दलाकडे विचारणा केली असता आम्ही आमच्या स्तरावरून कोणत्याही शाळेला मालवाहू वाहने पाठविली नव्हती, असे सांगण्यात आले. त्यामुळे मालवाहू वाहने आली कुठून या प्रश्नाचे उत्तर मिळणे कठीण झाले होते.
श्रोत्यांना हवी होती संदेशाची प्रत
आधीच बराच वेळ उन्हात ताटकळत बसलेले विद्यार्थी उन्हामुळे कासाविस झाले होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे अहिंसा संदेशाचे वाचन जरी त्यांनी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तरी त्यातीत मुद्दे त्यांच्या लक्षात राहतील का? याबद्दल मात्र शंका उपस्थित होत होती. संदेशाचे माईकवरून जाहीर वाचन करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्या संवादाची एक मुद्रित पत्र दिली असती तर किमान घरी जाऊनही त्यांना ते वाचन करून अहिंसेचे तत्व काय आहे हे समजून घेणे सोपे झाले असते, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांमध्ये उमटत होती.
चार ते पाच तास ताटकळत राहिले
सकाळी जवळपास ९ वाजतापासून विद्यार्थी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर येण्यास सुरूवात झाली. मुख्य मैदानात येण्यापूर्वी त्यांच्यासाठी पोटभर मसाला भात आणि पिण्यासाठी भरपूर पाण्याचीही व्यवस्था केली होती. मात्र बारकोड लावून मुख्य मैदानात प्रवेश केल्यानंतर बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे दुपारी अडीच पर्यंत चार ते पाच तास त्यांना ताटकळत राहावे लागले.
बारकोड रिडिंगमुळे नियोजन बिघडले
कार्यक्रमाला श्रोता म्हणून मैदानात उपस्थित राहणाºया प्रत्येक जणाची डिजीटल नोंद घेता यावी यासाठी प्रत्येकाच्या हातात बारकोड असलेला पट्टा घातला जात होता. मात्र तांत्रिक कारणामुळे बारकोडचे रिडिंग करण्यास कमालीचा विलंब लागत होता. दुपारी १२ पर्यंत अवघ्या १५०० जणांचा मैदानात प्रवेश झाला होता. अखेर बारकोड रिडींगच्या पद्धतीत थोडा बदल केल्यानंतर मग पटापट विद्यार्थ्यांना मैदानात प्रवेश मिळाला.

Web Title: School children and girls brought from cargo vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.