कोरची तालुक्यात शाळाबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:12 AM2019-08-19T00:12:31+5:302019-08-19T00:13:36+5:30
अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. १६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने ५ आॅगस्टपासून राज्यात आंदोलन सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे १६ आॅगस्टपासून राज्यभरातील अंशत: अनुदानित, अघोषित शाळा बंद ठेवण्याचे कृती समितीने ठरविले. त्यानुसार कोरची तालुक्यातील सर्व अघोषित, अंशत: अनुदानित शाळा शाळाबंद आंदोलनात सहभागी झाल्या. यामध्ये राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला, अरूणा विद्यालय कोटरा, शहीद बिरसा मुंडा हायस्कूल बोरी, टिपागड विद्यालय कोटगूल, धनंजय स्मृती विद्यालय देऊळभट्टी, महात्मा जोतिबा विद्यालय बेलगाव घाट आदी शाळांचा समावेश आहे.
शासनाकडे वेळोवेळी अनुदानाची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
वेतनवाढ प्रक्रिया ठप्प
२० टक्के अनुदान लागू केलेल्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वेतनात वाढ होईल, या आशेने कर्ज घेऊन रक्कम गुंतवली. मात्र २० टक्याच्या पलिकडचा टप्पा वेतनाने गाठला नाही. दरवर्षी २० टक्यानुसार पगार वाढत नसल्याने शिक्षक अडचणीत सापडले आहेत. विना अनुदानित शाळांचे कर्मचारी आर्थिक प्रश्नाने चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.