वर्गखाेल्यांच्या मुद्यावर कुरूड येथे २ मार्चला शाळा बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:11 AM2021-02-28T05:11:34+5:302021-02-28T05:11:34+5:30
देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारत बांधकामाची समस्या व विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून ...
देसाईगंज तालुक्याच्या कुरूड येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारत बांधकामाची समस्या व विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्यांचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. याबाबत पालकांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पुरेशा वर्गखाेल्या नाही. सहा खोल्यांमध्ये १२ वर्गाचे विद्यार्थी बसवावे लागत आहेत. यामध्ये इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ मध्ये नवीन इमारत बांधकाम मंजूर झाले हाेते. बांधकाम मंजूर झाल्यानंतर काही दिवसात कंत्राटदारामार्फत बांधकामास सुरुवात झाली. परंतु बांधकामासाठी निधी वेळाेवेळी देण्यात आला नाही. त्यामुळे साहित्य खरेदी वा इतर खर्च कुठून करावा, असा प्रश्न कंत्राटदाराला पडला व शेवटी शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम बंद करण्यात आले.
इमारतीचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचण येत आहे. शासनाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशाही स्थितीत विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसावे लागत आहे. त्यामुळे वर्गखाेल्यांचे लवकर बांधकाम करावे या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती २ मार्चला शाळा बंद करणार आहे, असा इशारा पालकांनी दिला आहे.