शालेय पोषण आहाराच्या खर्चाचा दर वाढला
By admin | Published: October 15, 2015 01:41 AM2015-10-15T01:41:26+5:302015-10-15T01:41:26+5:30
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. सदर पोषण आहार पुरविण्याच्या खर्चात राज्याच्या
पाच टक्क्यांनी वाढ : इंधन, भाजीपाला खर्चाचा समावेश
गडचिरोली : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. सदर पोषण आहार पुरविण्याच्या खर्चात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१५-१६ या वर्षात सुधारित दर लागू करून पाच टक्क्यांनी वाढ केली आहे.
पूर्वी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गासाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी आहार खर्च मर्यादा ३.५९ व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५.३८ रूपये दर निश्चित करण्यात आला होता. वाढत्या महागाईनुसार शासनाने या खर्चाच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. १२ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आता इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रती विद्यार्थ्यांना प्रतिदिन ३.७६ एवढी आहार खर्च मर्यादा व ३.६७ असा आहाराचा दर निश्चित करण्यात आला आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी ५.६४ आहार खर्च मर्यादा व आहाराचा दर ५.४६ इतका निश्चित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी धान्य पुरवठा करण्यासाठी २.३० एवढा खर्चाचा दर तर याच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणाऱ्या खर्चाचा दर १.३७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. ६ वी ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी धान्य पुरवठा खर्चाचा दर ३.७४, इंधन, भाजीपाला खर्चाचा दर १.७२ निश्चित केला आहे.