जिल्हाभरात शाळा, महाविद्यालये बंद
By admin | Published: October 7, 2016 01:29 AM2016-10-07T01:29:43+5:302016-10-07T01:29:43+5:30
कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीवर मोर्चा नेण्यात आला होता.
शिक्षकांवरील लाठीमार प्रकरणाचा निषेध : कान्व्हेंट शाळांनाही सुटी
गडचिरोली : कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने औरंगाबाद येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीवर मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार केला. या प्रकरणात ३०० शिक्षकांविरूध्द भादंविच्या ३०७ कलमान्वये (खुनाचा प्रयत्न) व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ५९ शिक्षकांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये शाळा, महाविद्यालय, इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंटही सहभागी झाले होते.
गडचिरोली शहरात सकाळपाळीतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. त्यानंतर विनाअनुदानित शाळा कृती समिती गडचिरोली जिल्हा व अन्य विविध शिक्षक संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय नार्लावार, सचिव टी. के. बोरकर, संस्थाचालक संघ कार्याध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, सचिव राजेंद्र लांजेकर, संस्थाचालक संघ कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजाभाऊ मुनघाटे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, कार्यवाह अजय लोंढे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विजय कोमेरवार, कार्यवाह रमेश बोरकर, डॉ. पंजाबराव देशमुख राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष शेषराव येलेकर, सचिव कमलाकर, रडके, विज्युक्टाचे अध्यक्ष भाऊराव गोरे, सचिव धर्मेंद्र मुनघाटे, राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अविनाश चडगुलवार, गडचिरोली जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष अशोक काचिनवार, सचिव संजय मल्लेलवार, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष पंकज नरूले, सचिव विजय मेश्राम, विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष विलास बल्लमवार, उपाध्यक्ष सुनिल पोरेड्डीवार, प्राचार्य जी. एम. दिवटे, मामीडवार, विनाअनुदानित कृती समितीचे कोषाध्यक्ष शेखर उईके, प्राचार्य जयंत येलमुले, विमाशीचे माजी प्रांतीय कोषाध्यक्ष शेमदेव चाफले आदी उपस्थित होते.
तसेच गुरूवारी अहेरी उपविभागातील विविध शाळाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या शाळांनीही बंद पाळला. अहेरी शहरातील राजे धर्मराव शाळा, भगवंतराव हायस्कूल, कै.च.ल. मद्दीवार शाळा, रिपब्लिक शाळा, साईबाबा प्राथमिक शाळा, संत मानव दयाल शाळा, उपविभागातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा बंद करण्यात आल्या. जय पेरसापेन माध्यमिक शाळा बुर्गी, संत मानवदयाल विद्यालय अहेरी, स्व.विमलताई ओल्लालवार विद्यालय बोरी, भगवंत हायस्कूल चेरपल्ली, रिपब्लिक इंग्लिश मिडियम स्कूल, भगवंतराव हायस्कूल पेरमिली, जय पेरसापेन विद्यालय कमलापूर, पुष्पप्रियादेवी विद्यालय जीमलगट्टा, पुष्पप्रियादेवी विद्यालय देवलमरी, राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली, संत मानवदयाल विद्यालय रंगय्यापल्ली, भगवंतराव हायस्कूल आरडा आदी शाळा बंद होत्या. इतर भागातही या आंदोलनाला शाळा, महाविद्यालय संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (जिल्हा प्रतिनिधी)