धानोरा मार्गाच्या वाहतुकीसाठी भंगार बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:31 AM2017-10-28T00:31:34+5:302017-10-28T00:31:44+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगाराच्या अनेक बसेस भंगार झाल्या असल्याने प्रवासादरम्यान रस्त्यावर बसेसमध्ये बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव २७ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला गडचिरोली-धोनारा मार्गावर प्रवाशांना आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराची गडचिरोली-धानोरा-गडचिरोली ही सायंकाळी ४ वाजता सुटणारी बस धानोरा येथे ५ वाजता पोहोचताच या बसगाडीमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी धानोरावरून गडचिरोलीकडे जाणाºया ३५ ते ४० प्रवाशांना अवैधरित्या सुरू असलेल्या खासगी वाहनांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागला. सदर बस गडचिरोली येथे पोहोचल्यानंतर चंद्रपूरकडे शेड्युल असल्यामुळे ही बस वेळेवर सुटू शकली नही. त्यामुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर बस चंद्रपूरकरिता गडचिरोली येथून ६.१५ वाजता सुटणार होती. मात्र बिघाड निर्माण झाल्याने ही बस मार्गस्थ करण्यात आली नाही. त्यानंतर एमएच २० डी ९३६३ क्रमांकाची बस धानोरासाठी देण्यात आली. मात्र बसचालकाने सदर बस चालविण्यास नकार दिला. प्रशासनाने हीच बस घेऊन जा, असे सांगितले. सदर बस धानोरा फेरी आटोपल्यानंतर बदलवून देतो, असे चालकाला सांगण्यात आले. विशेष म्हणजे, या बसमध्ये मोहडोंगरीजवळ बिघाड निर्माण झाला. बहुतांश बसगाड्यांची मर्यादा संपली असताना सुध्दा या बसगाड्या मार्गावर वाहतुकीवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळ प्रवाशांच्या जीवानिशी खेळ करीत आहे, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या अनेक बसगाड्यांमध्ये वायफाय इंटरनेट सुविधा असली तरी सेवा कुचकामी ठरली असून साहित्य निकामी ठरले आहेत. विशेष म्हणजे, सदर बसफेरीतील याच बसला यापूर्वी कोटगुल मार्गावरून येत असताना पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
ग्रामीण भागातील रस्ते पाहिजे त्या प्रमाणात सुस्थितीत नसल्याने तेथे खासगी वाहन वाहतुकीवर सोडले जात नाही, अशा वेळी प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र बसगाड्यांच्या देखभालीकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे.
आसने तुटलेली, तावदानेही दुरवस्थेत
राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसगाड्यांची आसने तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक बसगाड्यांमधील गादी गायब झाली आहे. शिवाय खिडक्यांचे तावदानेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय बसगाड्यांची नियमित योग्य प्रकारे स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने गडचिरोली व अहेरी आगारासाठी नव्या चांगल्या प्रकारच्या बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी प्रवासी मित्र मंडळांनी केली आहे.