सामंजस्याने पडला फी वाढीच्या वादावर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:03 AM2018-04-08T01:03:47+5:302018-04-08T01:04:00+5:30

दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला.

The screen on the promise of increasing fee hike | सामंजस्याने पडला फी वाढीच्या वादावर पडदा

सामंजस्याने पडला फी वाढीच्या वादावर पडदा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘प्लॅटिनम’च्या पालकांना दिलासा : संयुक्त पत्रपरिषदेत शेवट गोड झाल्याचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षी होणाऱ्या फी वाढीवर यावर्षी पालकांनी आक्षेप घेतल्याने पालक आणि प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या व्यवस्थापनामध्ये गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेला ताण-तणाव अखेर मिटला. प्लॅटिनमच्या संचालकांनी नवीन शैक्षणिक सत्राची शुल्कवाढ रद्द करीत पालकांची बाजू सकारात्मकरित्या समजून घेतल्याने पालकांनी आता या प्रकरणात शाळेच्या भूमिकेबद्दल आम्हाला कोणताच आक्षेप नसल्याचे सांगत शेवट गोड झाल्याचा आनंद व्यक्त केला.
शनिवारी प्लॅटिनम ज्युबिली शाळेत पालकांचे प्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन झालेला घटनाक्रम मांडला. यावेळी पालकांचे प्रतिनिधी संजय राऊत, राजेश चिलमलवार, अरुण सातपुते, प्रशांत मुपीडवार, रेवनाथ लांजेवार, विजया मने, संगीता राऊत, तसेच शाळेच्या वतीने सचिव अझिज नाथानी, संचालक राजू देवानी, प्राचार्य रहीम आमलानी, उपप्राचार्य सोहन मंगर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शुल्कवाढीवरून उद्भवलेल्या असंतोषाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्यानंतर हा विषय शिक्षण विभाग व जि.प. पदाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचला. शुक्रवारी शेवटची बैठक झाली. त्यात २०१८-१९ या वर्षाकरिता केली जाणारी १० टक्के शुल्कवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय २०१७-१८ मध्ये वाढविलेल्या फीमधील काही फी कमी करण्याचे ठरले. तसेच पहिली ते दहावीपर्यंत नियमित शिकत असताना पुन्हा प्रवेश फी न घेण्यावरही सहमती झाली.
यावेळी अझिज नाथानी यांनी सांगितले की, गडचिरोलीसारख्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांना वेळोवेळी योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई-दिल्लीवरून प्रशिक्षक बोलविले जातात. पण कोणतेही अतिरिक्त शुल्क पालकांकडून घेतले जात नाही. तरीही गोरगरीब पालकांचा विचार करून पालकांच्या भावनेचा आदर आम्ही राखल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरण शांत करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती पालकांनी दिली.
दिलगिरी व्यक्त
गडचिरोलीसारख्या ठिकाणी चांगले शिक्षण दुसरीकडे कुठे मिळत नाही याची आम्हाला कल्पना आहे. आम्हाला आमच्या मुलांची काळजी आहे म्हणूनच आम्ही थोडा आर्थिक भुर्दंड पडत असतानाही शाळेतून पाल्यांना काढले नाही, असे सांगत पालकांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. येथील शैक्षणिक गुणवत्ता पुढेही कायम राहील असा विश्वास करीत त्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The screen on the promise of increasing fee hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.