एसडीओंनी घेतला काेरची तालुक्यातील काेविडस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:51+5:302021-05-31T04:26:51+5:30
काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्याच्या दृष्टीने गावपातळीपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब ओळखून व तालुक्यातील काेविडस्थितीची माहिती घेण्याकरिता एसडीओ ...
काेराेना विषाणूचा संसर्ग राेखण्याच्या दृष्टीने गावपातळीपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही बाब ओळखून व तालुक्यातील काेविडस्थितीची माहिती घेण्याकरिता एसडीओ शेंडगे यांनी तालुक्यातील सरपंच संघटनेच्या सर्व सरपंचांची बैठक घेतली. कोरोना विषाणूपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे. परंतु तालुक्यातील काही नागरिक जागृतीअभावी अफवांवर विश्वास ठेवत आहेत. काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबतसुद्धा तालुक्यात सर्वत्र अफवा पसरल्यामुळे अधिकाऱ्यांना जनजागृती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सरपंच हा शासन व जनता यामधील महत्त्वाचा दुवा असल्यामुळे तालुक्यातील सरपंच संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये लसीचे महत्त्व आरोग्य विभागातर्फे पटवून देण्यात आले. तसेच तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे हे किती महत्त्वाचे आहे, हेही पटवून देण्यात आले. कोणत्याही अफवांना बळी न पडता वेळेवर सर्वांनी निर्देशानुसार लसीकरण करून घ्यावे. प्रत्येक गावापर्यंत सकारात्मक बाबी पोहोचवाव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी केले.
बैठकीला तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी डी. एम. देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी, बी. व्ही. हाक्के, मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. परिसरातील कुठल्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी किंवा कोरोनाची काेणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी सांगितले.
बाॅक्स
सातपुती व काेचीनाराला भेटी
आढावा बैठकीनंतर एसडीओ शेंडगे यांनी तालुक्यातील कोचीनारा व सातपुती ग्रामपंचायतीमधील लसीकरण शिबिरांना भेटी दिल्या. कोचीनारा येथे ३३ लोकांनी, व सातपुती येथे ८ अशा एकूण ४१ लाेकांनी प्रतिबंधक लस घेतली. २९ मे राेजी तालुक्यातील अतिसंवेदनशील कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोसमी नं. २ गावातील १० तर सोनपूर येथील २० अशा एकूण ३० लाेकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार सी. आर. भंडारी व कोटगूलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश टेकाम तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
300521\30gad_4_30052021_30.jpg
===Caption===
सरपंचांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, साेबत तहसीलदार भंडारी.