एसडीपीओंनी केली पुलाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 01:24 AM2017-04-28T01:24:00+5:302017-04-28T01:24:00+5:30
अहेरीपासून तीन किमी अंतरावरील प्राणहिता नदीपात्रात तेलंगणा व महाराष्ट्र राज्यास जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
वांगेपल्ली येथील बांधकाम : सुरक्षेकडे लक्ष देण्याचे निर्देश
अहेरी : अहेरीपासून तीन किमी अंतरावरील प्राणहिता नदीपात्रात तेलंगणा व महाराष्ट्र राज्यास जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी गुरूवारी वांगेपल्ली येथे पूल बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची व सुरक्षेची पाहणी केली.
मागील काही महिन्यापासून पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यामुळे अनेक नागरिक पूल बांधकाम पाहण्यासाठी वांगेपल्ली येथे येत आहेत. तसेच काही नागरिक दुचाकीने तेलंगणा येथे ये- जा करीत आहेत. मात्र यावेळी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम कर्मचाऱ्यांनी बांधकाम करतेवेळी स्व:तसह नागरिकांची काळजी घ्यावी व सुरक्षेकडे लक्ष द्यावे, असे निर्देश बांधकाम कर्मचाऱ्यांना दिले. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स लावावे व रात्रीच्या वेळेस योग्य प्रकाशाची सोय करावी, असे निर्देशही गजानन टोम्पे यांनी दिले. तेलंगणा शासन येत्या काही दिवसात कच्चा रस्ता बनवून या रस्त्यावरुन कागजनगर-अहेरी बसफेरी सुरु करणार असल्याची माहिती आहे. भेटीदरम्यान पूल बांधकामाचे मॅनेजर के. पी. रमेश, साइट इंचार्ज जी. श्रीनिवास आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)