कर न भरल्याने जेजानी पेपरमिल सील
By admin | Published: March 30, 2017 01:46 AM2017-03-30T01:46:37+5:302017-03-30T01:46:37+5:30
देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीतील बंद स्थितीत असलेला जेजानी पल्स अॅण्ड पेपर मिल यांच्याकडे
नगर पालिकेची कारवाई : ५८ लाख ८६ हजार ७६८ रूपयांची थकबाकी
देसाईगंज : देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीतील बंद स्थितीत असलेला जेजानी पल्स अॅण्ड पेपर मिल यांच्याकडे ५८ लाख ८६ हजार ७६८ रूपयांचा कर सन २००९-१० पासून ते सन २०१६-१७ पर्यंत थकबाकी आहे. त्यामुळे बुधवारी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी पेपरमिलला सील ठोकण्याची कारवाई केली.
जेजानी पल्स अॅण्ड पेपरमिलला कर भरण्याबाबत सूचना देऊनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न करता ते न्यायालयात गेलेले होते. परंतु न्यायालयाने त्यांच्या विरोधात नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तसेच त्यानंतर सुद्धा सूचना पालिकेच्या वतीने देण्यात आल्या होत्या. याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेरीस बुधवारी पेपरमिल सील करण्याची कारवाई करण्यात आली. या जप्ती वसुली मोहिमेत मुख्याधिकारी तैमूर मुलानी, कर निरीक्षक एस. व्ही. नगराळे, अंकुश गायकवाड, विलास दुमाणे, अरविंद इंदुरकर, रवींद्र शेंदरे व पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यापूर्वी नगर परिषद कॉम्प्लेक्समधील गाळे तसेच विविध वॉर्डातील वस्तू जप्त करून नगर परिषद कार्यालयात जमा करण्यात आले आहे. थकबाकीदार मालमत्ता कर धारक तसेच पाणीपट्टी कर धारक यांनी वेळेच्या आत कराचा भरणा न केल्यास यापुढे जप्तीची कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे. तेव्हा सक्तीची कारवाई व मानहानी टाळण्यासाठी करधारकांनी ३१ मार्चच्या आत कर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी मुलानी यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)