'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत कोनसरी लोहप्रकल्पावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:26 AM2018-02-21T01:26:38+5:302018-02-21T01:26:49+5:30
मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंबईत झालेल्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेत लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीशी राज्य शासनाने करार केल्याने आता कोनसरी येथे होणाऱ्या लोहप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील पहाडावरील लोहखनिजाची लीज मिळाल्यानंतर लॉयड मेटल्स कंपनीने चामोर्शी तालुक्यातील आष्टीनजीकच्या कोनसरी येथे लोहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने लॉयडने जवळपास ३५ शेतकºयांची सुमारे ५०.२९ हेक्टर शेतजमीन संपादित करुन जमिनीच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम २६ एप्रिल २०१७ रोजी धनादेशाद्वारे एमआयडीसीला दिली होती. एमआयडीसीने ही रक्कम शेतकºयांना दिली. त्यानंतर १२ मे २०१७ रोजी कोनसरी येथे प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना धनादेश वितरीत करण्यात आले होते. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एमआयडीसीने संबंधित शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्यात रक्कम देण्याविषयीचे पत्र लॉयड मेटल्स कंपनीला दिले. या पत्राची दखल घेत लॉयड मेटल्स कंपनीने ८ फेब्रुवारी २०१८ रोजींं तत्काळ ६ कोटी १ लाख ६९ हजार ८१८ रुपये एमआयडीसीकडे वळते केले.
सोमवारी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषद झाली. या परिषदेत राज्य सरकार व लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी लॉयड मेटल्सचे मालक राजेश गुप्ता व सरव्यवस्थापक अतुल खाडिलकर उपस्थित होते. या करारावर राज्याच्या उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल व लॉयड मेटल्सचे महाव्यवस्थापक हरिहरण एन.अय्यर यांच्या स्वाक्षºया आहेत. या करारानुसार, लॉयड मेटल्स कंपनी कोनसरी येथे ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून सुमारे ८०० सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्षात रोजगार मिळणार आहे. प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम जून २०२० पर्यंत तर, उर्वरित काम २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे लवकरच कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन बेरोजगारांना रोजगारांची संधी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.