...अन् तळ्याच्या मध्यभागी पेटणाऱ्या 'त्या' दिव्याचे रहस्य उलगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 04:17 PM2022-01-10T16:17:53+5:302022-01-10T16:22:49+5:30
चामाेर्शी तालुक्यातील तळाेधी माे. येथील गावानजीकच्या तळ्यात रात्री ९ वाजेच्या सुमारास पाणी असलेल्या तलावात मध्यभागी दिवा पेटत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली हाेती.
गडचिरोली : रात्रीच्या सुमारास तळोधी मो. या गावाजवळील तळ्याच्या मध्यभागी एक दिवा पेटत असल्याचे काही जणांना दिसले. पाहता-पाहता बातमी गावभर पसरली अन् विविध चर्चांना पेव फुटला. अखेर या दिव्याचे रहस्य उलगडले आहे.
चामाेर्शी तालुक्यातील तळाेधी माे. येथील गावानजीकच्या तळ्यात रात्री ९ वाजेच्या सुमारास पाणी असलेल्या तलावात मध्यभागी दिवा पेटत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली हाेती. नक्कीच काही तरी चमत्कार गावच्या तळ्यात घडला असावा, असे नागरिकांना वाटत हाेते.
तळ्याच्या मध्यभागी रात्रीच्या सुमारास दिवा पेटत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चामाेर्शी तालुका संघटक अतुल सुरजागडे यांना देण्यात आली. दरम्यान सुरजागडे यांनी अनिंसच्या कार्यकर्त्यांना घेऊन रात्रीच्या सुमारास तळ्याजवळ जाऊन चाैकशी केली. तर, दिवा तळ्याच्या मध्यभागी पेटत हाेता. पाणी भरपूर असल्याने त्या ठिकाणी नागरिक जात नव्हते. पाण्यामध्ये जाण्यासाठी काेणतीही सुविधा नव्हती. परिणामी, गावातील नागरिक भयभीत झाले हाेते.
अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हे गाव गाठून वस्तुस्थिती जाणून घेतली. गावातील एका इसमाचा मृत्यू अलीकडेच झाला हाेता. त्या कुटुंबातील व्यक्ती व नातेवाइकांनी धार्मिक विधी करून पेटता दिवा तलावाच्या मध्यभागी साेडल्याचे निष्पन्न झाले, आणि अशाप्रकारे तळ्याच्या मध्यभागी पेटणाऱ्या दिव्याचे रहस्य अखेर उलगडले. अंनिसच्या कार्यकर्त्यांद्वारे लाेकांची समजूत काढून त्यांच्यातील भीती नाहीशी करण्यात आली.