२८ पोलीस कर्मचाऱ्यांवर ५५ गावांच्या सुरक्षेचा भार
By admin | Published: May 13, 2016 01:34 AM2016-05-13T01:34:28+5:302016-05-13T01:34:28+5:30
जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.
चोरींच्या घटनांमध्ये वाढ : आष्टी पोलीस ठाण्याला हवेत ५० कर्मचारी
आष्टी : जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलीस ठाण्याला २८ पोलीस कर्मचारी देण्यात आले. मात्र सदर संख्या अपुरी आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार पाहता आष्टी पोलीस ठाण्याला ५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आष्टी परिसरात घडणारे विविध गुन्हे व चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आष्टी पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर येथे ५० ते ६० कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे राज्य शासनामार्फत सांगण्यात आले होते. मात्र याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आष्टी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली नाही. आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण ५५ गावांचा समावेश आहे. या ५५ गावांच्या परिसरात घडणाऱ्या विविध घटना, गुन्हे, आत्महत्या, भांडण, तंटे आदींची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे.
काही दिवसापूर्वी आष्टी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन दिवसात नऊ ठिकाणी घरफोडी केली. त्यामुळे गावातील नागरिक धास्तावले आहेत. वाढत्या चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकावर आहे. सद्य:स्थितीत आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून उमेश बेसरकर आहेत.
याशिवाय तीन पोलीस उपनिरीक्षक, महिला व पुरूष पोलीस कर्मचारी असे एकूण २८ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने आष्टी पोलीस ठाण्यात आणखी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)