नक्षलवाद्यांच्या पिछेहाटीचे श्रेय सुरक्षा दलांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:43 AM2019-01-24T00:43:35+5:302019-01-24T00:45:00+5:30

गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या योग्य नियोजनामुळे गडचिरोलीसह देशभरात नक्षलवाद, दहशतवादाची पिछेहाट होत आहे. याचे श्रेय सुरक्षा दलाच्या बहादूर जवानांचे आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात माओवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती बुधवारी (दि.२३) भाजपच्या थेट कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात दिली.

The security forces of Naxalites are responsible for the backwardness | नक्षलवाद्यांच्या पिछेहाटीचे श्रेय सुरक्षा दलांना

नक्षलवाद्यांच्या पिछेहाटीचे श्रेय सुरक्षा दलांना

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींचा भरगच्च व्हिडिओ संवाद : ओबीसी आरक्षण आणि रेल्वेच्या प्रश्नाला दिली बगल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या योग्य नियोजनामुळे गडचिरोलीसह देशभरात नक्षलवाद, दहशतवादाची पिछेहाट होत आहे. याचे श्रेय सुरक्षा दलाच्या बहादूर जवानांचे आहे, असे गौरवोद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात माओवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती बुधवारी (दि.२३) भाजपच्या थेट कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात दिली. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीमधल्या नरेश अलसावार या बुथ प्रमुखाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
चंद्रपूर मार्गावरील लॉनवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स संवादाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, आ.बंटी भांगडिया, प्रदेश संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, माजी आ.अतुल देशकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याशिवाय गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भाजपचे बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, माजी पंतप्रधानांनी देशात माओवाद वाढत असल्याचे वक्तव्य केले होते. पण आज माओवाद कमी होऊन विकासवाद वाढत आहे. हिंसेच्या माध्यमातून माओवादी आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिले. यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांचे मी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
आज देशात माओवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या १२६ वरून ९० झाली आहे. ३६ अतिसंवेदनशिल जिल्ह्यांची संख्या ३६ वरून ३० वर घटली आहे. या जिल्ह्यांमध्ये ४५०० किलोमीटरच्या मार्गांची बांधणी झाली. २४०० मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून ४००० टॉवरला अजून मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर ११ पैकी ८ जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय, सर्वाधिक बँक आणि एटीएम सुविधा देण्यात आल्याची माहिती मोदींनी दिली. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना मोदींनी ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ हा नारा देत आपल्या कामावर लक्ष केंद्र करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली.
भरगच्च भरलेल्या लॉनवरील मंडपात दुपारी २ वाजतापासून कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी आ.डॉ.होळी, आ.भांगडिया, आ.संजय पुराम, बाबुराव कोहळे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाघरे यांनी, संचालन अनिल तिडके यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश गेडाम यांनी केले.
खासदारांनी मांडला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा
या कार्यक्रमात मोदी गडचिरोलीकडे वळताच सर्वप्रथम खासदार अशोक नेते यांनी त्यांच्याशी संवाद साधला. देशातील मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलपिडीत गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यात समाविष्ट केल्याबद्दल आभार व्यक्त केले. रस्ते, पूल यासाठी जिल्ह्याला भरपूर निधी मिळाला. परंतू नागपूर-नागभिड या रेल्वेमार्गाचे विकासाचे काम संथगतीने सुरू आहे ते लवकर करावे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण १९ वरून ६ टक्के झाले ते पूर्ववत १९ टक्क्यांवर आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र या दोन्ही मुद्द्यांना मोदींनी बगल दिल्यामुळे अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला.
व्यूहरचनेतून विजय शक्य-अहीर
मोदींच्या संवाद कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. माझे बुथ म्हणजे माझी लोकसभा, विधानसभा हे गणित लक्षात ठेवून कामाला लागा. गुजरातमधील निवडणूक कार्यकर्त्यांच्या भरोशावरच जिंकली. काँग्रेसने नेते जमवले, पण भाजपने कार्यकर्ते जमवले असून हीच पक्षाची शक्ती आहे. कार्यकर्त्यांना दिलेल्या जबाबदाºया त्यांनी व्यवस्थित पार पाडल्यास विजय भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मराठीतून संवाद आणि बाळासाहेबांचे स्मरण
या थेट संवाद कार्यक्रमाची सुरूवात पंतप्रधान मोदींनी मराठीतून केली. ‘सर्वांना माझा नमस्कार. आज महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी बोलण्याची संधी मला मिळाली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या कुशल नेतृत्वाने सामान्य माणसाला मोहीत केले. त्यांच्या कार्याची प्रेरणा युवकांना मिळावी म्हणून सरकारने १०० कोटींच्या स्मारकाला परवानगी दिली.’ एवढा संवाद त्यांनी मराठीतून करून शिवसेनेशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला.
एकाच कार्यकर्त्याला संधी
पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने तीनही जिल्ह्यातून कार्यकर्ते जमले होते. परंतू खासदार नेते यांच्या भाषणानंतर चामोर्शीतील एकाच कार्यकर्त्याला यावेळी बोलण्याची संधी मिळाली. आपल्या कार्यकाळात नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असताना त्याचा गमगवा माध्यमांमधून का होत नाही, असा प्रश्न त्या कार्यकर्त्याने केला. त्याच प्रश्नावर बोलताना मोदींनी माओवादाविरूद्धच्या लढाईची यशोगाथा मांडली. त्यानंतर पुढील प्रश्न घेण्याऐवजी हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे मोदींशी संवाद साधण्याची तीव्र इच्छा बाळगून असलेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. इतर जिल्हे आटोपल्यानंतर पुन्हा ते गडचिरोलीकडे वळतील अशी सर्वांना आशा होती. परंतू तसे झाले नाही.

Web Title: The security forces of Naxalites are responsible for the backwardness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.