बियाणे-खते कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:11 AM2020-07-05T00:11:42+5:302020-07-05T00:12:19+5:30
स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून आणि कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. त्यानिमित्त शनिवारी दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथे शेतकरी संवाद कार्यक्र माचे आयोजन केले होते. नैनपूरचे प्रगतीशिल शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमात त्यांचा काळ्या भात बियाण्यांचे प्रवर्तक म्हणून सपत्निक सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : राज्यातील खरीप व रबी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकºयाला आवश्यक बी-बियाणे व खते कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे शेतकऱ्यांना उद्देशून दिली. वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकºयांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते.
स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून आणि कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. त्यानिमित्त शनिवारी दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथे शेतकरी संवाद कार्यक्र माचे आयोजन केले होते. नैनपूरचे प्रगतीशिल शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमात त्यांचा काळ्या भात बियाण्यांचे प्रवर्तक म्हणून सपत्निक सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषीमंत्र्यांनी ठाकरे यांचे कौतुक करून त्यांच्याप्रमाणे शेकडो शेतकरी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. नैनपूर येथील कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर, वडसाच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, माजी आमदार रामकृष्ण मडावी, आनंदराव गेडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.संदीप कऱ्हाळे, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, वडसाचे विभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील अडचणी आपल्याला लक्षात येत आहेत, त्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, गुणवत्ता वाढविणे यासाठी जिल्ह्यात चांगले उपक्र म राबविले जाणार असल्याचे ते म्हणाले.
ना.भुसे यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, आ.डॉ.देवराव होळी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीतील काम म्हणजे पुण्यकर्म
गडचिरोलीमध्ये काम करण्याची संधी मिळणे म्हणजे पुण्याचे काम आहे, असे समजून प्रत्येकाने दुर्गम भागात गरजूंना सेवा द्यावी. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे, असे कृषीमंत्री भुसे यांनी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी पीक कर्ज, पीक विमा योजना, बियाणे, खते आणि इतर कृषी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. सर्व तालुक्यात धान व कापसाचे बियाणे एका आठवड्यात पुरविण्याची सूचना केली.