विटाभट्टीवरील १० ट्रॅक्टर लाकूड जप्त
By admin | Published: February 12, 2016 01:50 AM2016-02-12T01:50:03+5:302016-02-12T01:50:03+5:30
तालुक्यातील मुरूमगापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १० ट्रॅक्टर लाकूड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुरूवारी जप्त केले आहेत.
वन विभागाची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल; कुलभट्टी येथील घटना
धानोरा : तालुक्यातील मुरूमगापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १० ट्रॅक्टर लाकूड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुरूवारी जप्त केले आहेत. त्याचबरोबर ६० हजार रूपयांच्या विटाही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दिनकर भानारकर रा. कुलभट्टी व राजीक रहेमान खान रा. मुरूमगाव या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी जंगलातील लाकडाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता, घटनास्थळावर लाकडांचा ढिग पडला असल्याचे दिसून आले. सदर कारवाई मुरूमगाव (पूर्व) वन परिक्षेत्राधिकारी वाय. एस. उईके यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक एच. डी. मुंजुमकर, वनरक्षक जे. जी. आत्राम, वनरक्षक आर. बी. मडावी, लाकडे, दुधबळे, दिलीप आत्राम, गेडाम यांनी केली.
वन विभागांच्या अधिकाऱ्यांनी विटाभट्टीबाबत महसूल विभागाच्या परवान्याबाबत विचारले असता, महसूल विभागाकडूनही परवाना काढला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विटाभट्टीचा संपूर्ण व्यवसायच अवैधरितीने केला जात असल्याची लक्षात आले. त्यामुळे पंचनाम्यानंतर विटांबाबतही महसूल विभागाकडून दंड ठोठावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईनंतर वन परिक्षेत्राधिकारी वाय. एस. उईके व भगवान आत्राम यांच्या मार्गदर्शनात जंगल भागात चौकशीसाठी पथके तैनात केली आहेत. (तालुका प्रतिनिधी)