सील ठोकलेल्या घरातून जप्त केलेला गूळ गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:00 PM2018-04-30T23:00:04+5:302018-04-30T23:00:14+5:30
तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
जाफ्राबाद येथील स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने १६ एप्रिल रोजी गडचिरोली येथे भेट घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व दारूबंदी मुक्तिपथ कार्यालयास लेखी निवेदन दिले. सदर निवेदनात त्यांनी अवैध काळा गूळ व त्यापासून गाळलेल्या दारूपासून होणारे गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आणून दिले. १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता बामणी पोलिसांनी जाफ्राबाद येथील घर क्र. ३०४ ला सिल ठोकले. सदर घर जयहिंद मुत्तय्या अल्लुरी या इसमाचे आहे. सदर घर पडीक होते. या घरात मोठ्या प्रमाणात काळा गूळ साठवून ठेवला होता. घराच्या दोन्ही दारांना पोलिसांनी सिल ठोकले. मात्र काही दिवसातच या घरातील गूळ पूर्णपणे गायब झाला आहे. घर जयहिंद अल्लुरी यांच्या मालकीचे असले तरी त्यातील काळा गूळ हा देवाजी यलय्या दुर्गम या इसमाचा आहे, अशी माहिती गावकºयांनी दिली आहे. देवाजी हा दारू तस्कर आहे. पूर्वी सागवान लाकूड तस्करीच्या गुन्ह्यात वन विभागाने त्याचे वाहन जप्त केले होते, हे विशेष. पोलिसांनी सिल ठोकून ठेवले असतानाही गूळ गायब झाला कसा, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सिल ठोकल्यावर त्या मालाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसांची राहते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाबाबत बामणी पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. गूळ गायब होऊनही पोलीस मात्र सदर प्रकरण गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गावकरी गावात दारूबंदी करण्यासाठी प्रयत्नरत असतानाच पकडून दिलेले गूळ गायब झाल्याने गावकरी निराश झाले आहेत.
१९ एप्रिल रोजीच शंकर व्यंकय्या आशा या इसमाची दारू जप्त केली होती. दारूविक्रेत्याच्या विरोधात कोणती कारवाई केली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.