आठ बैलबंड्यांवर जप्तीची कारवाई
By admin | Published: October 30, 2015 01:41 AM2015-10-30T01:41:14+5:302015-10-30T01:41:14+5:30
कठाणी नदी घाटातून बैलबंड्यांद्वारे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ बैलबंड्ड्यांवर जप्तीची कारवाई गडचिरोली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केली आहे.
अवैध रेती वाहतूक : कठाणी नदीतून रेतीची तस्करी
गडचिरोली : कठाणी नदी घाटातून बैलबंड्यांद्वारे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ बैलबंड्ड्यांवर जप्तीची कारवाई गडचिरोली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी केली आहे. सदर कारवाई बुधवारी पहाटेच्या सुमारास केली.
कठाणी नदीघाटाचा अजूनपर्यंत लिलाव झालेला नाही. तरीही शहरातील काही बैलबंडीधारक पहाटेच्या सुमारास रेतीची वाहतूक करीत होते. सदर रेती शहरातील नागरिकांना प्रतिबंडी २५० ते ५०० रूपयांपर्यंत विकली जात होती. ही बाब गडचिरोलीचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना माहित झाली. त्यानंतर बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कठाणी नदीघाटावर पाळत ठेवून बैलबंडीने रेती आणते वेळी त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली. आठही बैलबंड्या तहसील कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सुनील महागो मेश्राम, चंदरशहा दुगा हिचामी, भय्याजी मनोहर पिपरे, प्रेमदास डोनुजी चापले, गणेश मोतीराम पिपरे, योगेश मधुकर धोडरे, उद्धव चिनुजी नैताम, सुभाष श्यामराव नैताम यांच्या बैलबंडीचा समावेश आहे. बंड्या जप्त करण्यात आल्या असल्या तरी बैलांना मात्र सोडण्यात आले. याबाबत तहसीलदार डी. जी. जाधव यांना विचारणा केली असता, संबंधित बैलबंडीधारकांवर दंड ठोकून बंडी वापस केली जाईल, अशी माहिती दिली.
सदर कारवाई तहसीलदार जाधव यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी व्ही. एम. मुपीडवार, तलाठी ए. आर. तुंकलवार, बी. ए. बांबोळे, दिलीप डोंगरे, चौधरी, संजय लाडवे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)