येल्लातील मोहफुलाचा सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:26+5:30
अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भासते. सदर सरपण सुद्धा जंगलातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे दारू काढणारे जंगलातच दारू काढत असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावालगत असलेल्या झुडूपी जंगलात धाड टाकून सुमारे ४० हजार रुपयांचा मोहफूल सडवा व मुद्देमाल जप्त केला आहे.
लॉकडाऊनमुळे देशी व विदेशी दारू मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दारू पिणारे आता मोहफुलाच्या दारूकडे वळले आहेत. या संधीचा फायदा उचलत अनेकांनी दारू काढण्यास सुरूवात केली आहे. येल्ला येथील जंगलात मोहफुलाची दारू काढली जात असल्याची गोपनीय माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस, पोलीस हवालदार काशिनाथ दुबे, मारोती मोदेकर, दुर्गासिंग घाटघुमर यांनी जंगलात धाड टाकून ४० हजार रुपयांचा मोहफूल सडवा व मुद्देमाल जप्त केला आहे.
या ठिकाणी मोहफुलाचा सडवा भरलेले पाच ड्रम आढळून आले. याप्रकरणी चार आरोपींवर दारूबंदी व साथरोग प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहेरी तालुका नक्षल प्रभावित आहे. त्यामुळे जंगलात जाऊन कारवाई करणे पोलिसांसाठी धोक्याचे राहत असल्याने याचा गैरफायदा उचलत काही नागरिक जंगलातच मोहफुलाचा सडवा बनवतात. त्यानंतर या सडव्यापासून दारू काढली जाते. दारू काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सरपणाची गरज भासते. सदर सरपण सुद्धा जंगलातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे दारू काढणारे जंगलातच दारू काढत असल्याचे दिसून येते.
दारूची मागणी वाढली
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक घरीच आहेत. तसेच देशी व विदेशी दारू मिळणे जवळपास कठीण झाले आहे. त्यामुळे दारूचे शौकीन आता मोहफुलाच्या दारूकडे वळले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी घराच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात असला तरी याचे पालन ग्रामीण भागातील नागरिक करीत नाही.