संशोधनाचा मार्ग निवडावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:52 PM2018-01-09T22:52:37+5:302018-01-09T22:53:03+5:30
विज्ञानाच्या कक्षा अनेक आहेत. त्या ओळखा व चिकित्सकपणे शोधक नजर ठेवा ज्यातुन संशोधनाचा मार्ग सापडतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : विज्ञानाच्या कक्षा अनेक आहेत. त्या ओळखा व चिकित्सकपणे शोधक नजर ठेवा ज्यातुन संशोधनाचा मार्ग सापडतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी केले.
गोगाव येथील सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोगाव येथे आयोजित अब्दूल कलाम नगरीत ४३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून खासदर अशोक नेते उपस्थित होते. प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, डायटचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपत आडे, मनोहर पोरेट्टी, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी चलाख, सामाजिक कार्यकर्ते रियाजभाई शेख, संस्थाप्रमुख जयंत येलमुले, अमर गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना अध्यक्ष भांडेकर म्हणाल्या की, राष्ट्रीय स्वयंशिक्षण परिषद दिल्ली अंतर्गत मार्गदर्शक सुचनेनुसार या विज्ञान परिषदेचे आयोजन केल्या जाते. तालुक्याच्या ठिकाणी अशा विज्ञान प्रदर्शनीचे १९८८ पासून सलग सुरु असून हे ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातून राज्यस्तरावरील प्रवेशासाठी आठ विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची निवड करण्यात येईल.
मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असे जाणवले की, माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी नसून विद्यार्थी विज्ञान निष्ठ व्हावा मात्र समाजनिष्ठ बनून समाज सेवा करण्यासाठी त्याची कल्पकता उपयोगी पडावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी वाढत्या महागाईच्या काळात निधी कमी पडत असला तरी यापुढे आवश्यक त्या गरजांची पुर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद निधीची तरतुद करेल असे आश्वासन दिले. प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य शरदचंद्र पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात असच कां? म्हणून प्रश्न उपस्थित करावा, तो विचारावा, विचार करावा व संशोधकदृष्टीने शोध घ्यावा व त्याचा द्यास धरावा. शिक्षण विभागानी गुणवत्तेचा उत्सव साजरा करावा आणि विद्यार्थ्यामध्ये कल्पनाशक्तीला वाव देणारी संधी उपलब्ध करुन द्यावी असे सुचित केले. खासदार अशोक नेते, उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनीही समुचीत भाषण केले. प्रास्ताविकतेतून शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली.