सक्षमतेसाठी स्वावलंबनाचा मंत्र
By admin | Published: July 6, 2016 01:45 AM2016-07-06T01:45:58+5:302016-07-06T01:45:58+5:30
आपली सक्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांनी सर्वप्रथम स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे, महिला बचत गटांनी तळोधी येथे सुरू केलेला
खासदारांचे प्रतिपादन : तळोधीत जैविक खत विक्रीकेंद्राचा शुभारंभ;३०० महिलांना रोजगार
चामोर्शी : आपली सक्षमता सिद्ध करण्यासाठी महिलांनी सर्वप्रथम स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे, महिला बचत गटांनी तळोधी येथे सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या उपक्रमासाठी आपण खासदार निधीतून पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्र तळोधीद्वारा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प सुरू केला असून या केंद्रातील जैविक खत विक्री केंद्राचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला कृषी सहसंचालक घोलप, बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे संचालक पवार, जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, तळोधीच्या सरपंच माधुरी सूरजागडे, उपसरपंच किशोर मांदाडे, श्रमसाफल्य लोकसंचालिक साधन केंद्राच्या अध्यक्ष गीता वैरागडे उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते यांनी श्रमसाफल्य लोक संचालित साधन केंद्राने बचत गटातील शेतकरी महिलांकरिता राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र अजुनपर्यंत जिल्ह्यातील शेतकरीवर्ग याकडे वळलेला नाही. मात्र जवळच जैैविक खत उपलब्ध झाल्यास शेतकरी या खताचा वापर करेल, जैविक खतामुळे कमी खर्चात शेती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा लाभ होतो, असे मार्गदर्शन केले.
जिल्हा समन्वयक कांता मिश्राम यांनी साधन केंद्राची कार्य करण्याची दिशा स्पष्ट केली. संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्प बचत गटातील महिलांना नेहमी रोजगार उपलब्ध करून देणारा आहे, असे मार्गदर्शन केले. साधन केंद्राच्या सचिव इंदिरा गौरकार यांनी आॅडिट रिपार्टचे वाचन केले तर पौर्णिमा खोब्रागडे यांनी चालू वर्षाचा शाश्वत नियोजन आराखडा प्रस्तूत केला.
कार्यक्रमाचे संचालन मोहन धनोटे तर आभार इंदिरा दहेलकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रवीण गडपायले, चारूदत्त वाढई, विक्रम त्रिपदे, दर्शना रामटेके, भारती नांदगावे, यशोदा मामीडवार यांनी सहकार्य केले. या प्रकल्पामुळे ३०० महिलांना रोजगार मिळाला आहे. (प्रतिनिधी)