ज्येष्ठांनी सवलतींचा लाभ घ्यावा
By admin | Published: July 18, 2016 02:14 AM2016-07-18T02:14:30+5:302016-07-18T02:14:30+5:30
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना व सवलती आहेत. शासकीय योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, ...
न्यायालयात कायदेविषयक शिबीर : जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे आवाहन
गडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना व सवलती आहेत. शासकीय योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सु. सो. शिंदे यांनी रविवारी केले.
जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा न्यायालयात ‘ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कायदे व शासकीय योजना’ या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून न्यायाधीश सु. सो. शिंदे बोलत होते. शिबिरात मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश- २, तथा सहायक सत्र न्यायाधीश एस. टी. सूर, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव ता. के. जगदाळे, मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) कळसकर, दिवाणी न्यायाधीश सिंघेल, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. एम. बर्लावार, संघटनेचे सचिव डी. डी. सोनटक्के उपस्थित होते.
प्रास्ताविकातून न्यायाधीश ता. के. जगदाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसंबंधी कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. सहायक सत्र न्यायाधीश एस. टी. सूर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, त्यांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे डी. एन. बर्लावार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना याबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना व सवलतींचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ लिपीक व्ही. व्ही. वाळके तर आभार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव डी. डी. सोनटक्के यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)