४०० शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी तर ३०० शिक्षकांना नियमित श्रेणी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:34 AM2021-05-22T04:34:04+5:302021-05-22T04:34:04+5:30
गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे निकाली काढण्यास जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गतीने ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेंतर्गत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे निकाली काढण्यास जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गतीने प्रक्रिया सुरू केली आहे. जि.प.अंतर्गत ४०० शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी तसेच ३०० शिक्षकांना स्थायी व नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच काढले आहे.
जि.प.कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतनविषयक लाभ विलंबाने मिळत असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांना विभागप्रमुखाच्या आढावा बैठकीत निदर्शनास आली. जि.प.च्या काेणत्याही कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित राहता कामा नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिली. दरम्यान, आशीर्वाद यांनी यापूर्वी ३०० शिक्षकांना व अलीकडे ४०० शिक्षकांना सेवेच्या १२ वर्षांनंतर देय हाेणारी व सेवानिवृत्ती वेतनामध्ये लाभदायक ठरणारी चटाेपाध्याय आयाेगांतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली आहे. तसेच विविध सेवाविषयक लाभ मंजुरीकरिता आवश्यक असलेले सेवेत नियमित व स्थायीबाबतच्या एकूण ३०० प्रकरणास त्यांनी मंजुरी प्रदान केली आहे.
शिक्षकांची वेतनश्रेणी व विविध प्रलंबित सेवाविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुत्तीरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, अधीक्षक वैभव बारेकर यांच्यासह इतर अधिकारी व लिपिकांचे सहकार्य लाभले.
काेट...
सद्यस्थितीत काेराेना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बाेलाविता आले नाही. परंतु संघटनांच्या मूळ निवेदनातील मागण्यांचे अवलाेकन करून तसेच अभ्यासपूर्वक चर्चा करून मागण्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शिक्षक संवर्ग व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ वेळीच मंजूर करून देऊन या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशासकीय सेवा देण्यास प्राेत्साहन मिळावे, हा यामागील हेतू आहे.
- कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिराेली