समस्याग्रस्त लोकांची सेवा करणार; डॉक्टर झालेल्या आदिवासी मुलीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 07:21 PM2020-02-25T19:21:54+5:302020-02-25T19:22:41+5:30

माडिया जमातीमधील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवणा-या या मुलीचे नाव आहे डॉ. कोमल मडावी.

Serving troubled people; Desire of a adhivasi community girl who is a doctor | समस्याग्रस्त लोकांची सेवा करणार; डॉक्टर झालेल्या आदिवासी मुलीची इच्छा

समस्याग्रस्त लोकांची सेवा करणार; डॉक्टर झालेल्या आदिवासी मुलीची इच्छा

googlenewsNext

गडचिरोली : इयत्ता चौथीपर्यंत ज्या मुलीला मराठीसुद्धा धड समजत नव्हते, ती आदिवासी समाजातील अतिमागास अशा माडिया जमातीतील मुलगी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाली आहे. माडिया जमातीमधील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवणा-या या मुलीचे नाव आहे डॉ. कोमल मडावी. आपल्या लेकीची ही झेप तिच्या आई-वडिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

‘ज्या लोकांमध्ये मी लहानपणापासून राहिले, त्यांच्या आरोग्यविषयक समस्या, अडचणी जवळून पाहिल्या तेच लोक माझ्या डॉक्टर होण्यामागील प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आरोग्य सेवा देणे हेच माझे ध्येय आहे,’ अशी स्पष्ट भावना डॉ. कोमलने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
नुकत्याच लागलेल्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या निकालात कोमल उत्तीर्ण झाल्यानंतर समाजातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचा स्वीकार करत सोमवारी (दि.२४) ती आपल्या गावावरून इंटर्नशिपसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रवाना झाली. यादरम्यान ‘लोकमत’शी भ्रमणध्वनीवर संवाद साधत डॉ.कोमलने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाला उजाळा दिला.

गडचिरोलीपासून २०० किलोमीटरवर सिरोंचा तालुक्यात असलेल्या झिंगानूर या छोटाशा गावात कोमल तिसरीपर्यंत शिकली. गावात माडिया जमातीचे लोक, तीच बोलीभाषा आणि शिकवणारे शिक्षकही माडिया भाषेतूनच बोलणारे. त्यामुळे मराठीसुद्धा धड कळत नव्हते. अशात आरोग्य सेविका असलेली आई श्यामला मडावी यांची बदली सिरोंचा येथे झाली. त्यामुळे कोमलचे दहावीपर्यंतचे शिक्षण सिरोंचात सुरू झाले. जिद्द, हुशारी आणि व्यवसायाने शेतकरी असलेले व कमी शिक्षित असतानाही मुली शिकल्या पाहीजे म्हणून प्रोत्साहन देणारे कोमलचे वडील कासा मडावी यांच्या हिंमतीमुळे कोमल नागपूरला शिकायला गेली.  सरकारी होस्टेलमध्ये राहून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन कोमलने एमबीबीएसची प्रवेश पात्रता परीक्षाही उत्तीर्ण केली. आता यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिने हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलवादाने पीडित भागात खासगी वैद्यकीय सेवा मिळणे तर दूर, सरकारी रुग्णालयेही डॉक्टरांअभावी ओस पडलेली असतात. त्यामुळे या भागातील लोकांची वैद्यकीय सेवेत मोठी आबाळ होते. या वंचितांना योग्य ती वैद्यकीय सेवा देण्याचा डॉ.कोमलचा मानस आहे. एमबीबीएसनंतर एमएस (मास्टर इन सर्जरी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्याचीही इच्छा असल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले.

लहान बहीणही होतेय डॉक्टर
कोमलपाठोपाठ तिची लहान बहीण पायल हीसुद्धा डॉक्टर होत आहे. ती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि स्वत:मध्ये चिकाटी असेल तर दुर्गम भागातील मुलीही उच्च शिक्षण घेऊन करीअर घडवू शकतात, हेच कोमल व पायलने दाखवून दिले आहे.

Web Title: Serving troubled people; Desire of a adhivasi community girl who is a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.