गौण वनौपज संकलन २० केंद्रे स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:03 AM2019-04-18T00:03:42+5:302019-04-18T00:05:31+5:30
मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील वर्षी स्थापन करण्यात आलेला गौण वनोपज संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यावर्षी २० गौण वनोपज संकलन केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळ व आदिवासी विकास महामंडळ यांच्या बैठकीत घेण्यात आला.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन अनेक महिला स्वत:चे उद्योग व्यवसाय स्थापन केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात गौण वनोपजाचे उत्पादन होते. वनोपज गोळा करण्याचे कौशल्य येथील नागरिकांना पिढीजात प्राप्त झाले आहेत.
शेतीचा हंगाम संपल्यानंतर वनोपज गोळा करण्यावरच येथील नागरिक विशेष भर देतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे वनोपज गोळा होते. मात्र अधिकृत खरेदीदार नसल्याने विक्रीच्या समस्या निर्माण होते. याचा गैरफायदा काही व्यापारी उचलतात. गावात जाऊन अगदी कवडीमोल भावाने वनोपज खरेदी केले जाते. ही बाब महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर बचत गटांच्या मार्फत वनोपज संकलन केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला.
मागील वर्षी पाच संकलन केले सुरू केले होते. या केंद्रांच्या माध्यमातून आजपर्यंत वर्षभरात १ लाख १७ हजार ४१४ रुपयांचे वनोपज गोळा करण्यात आले आहे.
संकलन केंद्रांची संख्या वाढल्यास स्थानिक महिलांना रोजगार मिळेल, तसेच वनोपजालाही भाव मिळेल, या उद्देशाने २० संकलन केंद्र स्थापन केले जाणार आहे.
कामाचा आढावा
आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोली येथे १६ एप्रिल रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, प्रादेशिक व्यवस्थापक जयप्रकाश राजुरकर, प्रतवारी कार अण्णासाहेब पवार, उप महाव्यवस्थापक जयंत उमाडे, उपप्रादेशिक व्यवस्थापक राजपूत, चारूदत्त वाढई आदी उपस्थित होते. या बैठकीत संकलन केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सदर संकलन केंद्रावर आवक वाढावी, यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. गौण वनोपजाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे.