गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:53 PM2019-07-17T22:53:09+5:302019-07-17T22:53:37+5:30
आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले.
आदिवासी विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनासंदर्भात राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या दालनात मुंबई येथे बुधवारी बैठक पार पडली. यावेळी त्यांनी निर्देश दिले. बैठकीला आदिवासी विकास विभाग तसेच आदिवासी विकास महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीमध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रात दुर्गम, जंगलग्रस्त जिल्ह्यांमध्ये एकूण खरेदीच्या मानाने धान्य साठवणूक क्षमता ही अपुरी असल्याने प्रतिवर्षी एकूण खरेदी केलेला धान्यसाठा हा तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्रीने झाकून ठेवावा लागतो. त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरात लवकर पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश डॉ. परिणय फुके यांनी आदिवासी विकास विभाग व आदिवासी विकास महामंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
योजना राबवा
शासनाच्या माध्यमातून आदिवासींकरीता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजना लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाने व आदिवासी विकास महामंडळाने आवश्यक ते प्रयत्न करावेत. आदिवासींच्या योजनांसाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन डॉ. फुके यांनी दिले.