लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:31 AM2018-07-16T00:31:01+5:302018-07-16T00:31:34+5:30
जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली व चामोर्शी येथील लोकअदालतीत ३३ प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला.
गडचिरोली येथील राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये १८ लाख ८४ हजार ५१७ रूपयांची एकूण १८ प्रलंबित प्रकरणे तसेच २० हजार ३१५ रूपयांची ९ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढली. असे एकूण १९ लाख ४ हजार ८३२ रूपयांची २७ प्रकरणे निकाली काढली. गडचिरोली येथील लोकअदालतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मेहरे यांच नियंत्रणाखाली विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. जी. कांबळे यांच्या मार्गदर्शनात लोक न्याय अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी पॅनल क्रमांक १ चे पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तर दिवानी न्यायाधीश तथा मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी पॅनल २ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायालयातील वकील, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
चामोर्शी न्यायालयाने काढली ४ लाख ७५ हजार रूपयांची प्रकरणे निकाली
चामोर्शी : तालुका विधी सेवा समिती चामोर्शीच्या वतीने दिवानी व फौजदारी न्यायालय चामोर्शी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीत चामोर्शी न्यायालयाचे दिवानी स्वरूपाचे १६, फौजदारी स्वरूपाचे ३० व ७९ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. ग्राम न्यायालय मुलचेराची पाच दिवानी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी दोन दिवानी व चार फौजदारी प्रकरणात आपसी समजोता करण्यात आला. या निकालांमध्ये ४ लाख ७५ हजार रूपयांची वसुली करण्यात आली. अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून सहदिवानी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी लि.दा. कोरडे तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रेमा आर्इंचवार, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद वायलालवार यांनी काम पाहिले. लोकअदालतीकरिता तालुका अधिवक्ता डी. व्ही. दोनाडकर, ए. जे. उंदीरवाडे, के. टी. सातपुते, डिम्पल उंदीरवाडे, एम. के. आठमाडे, पी. एम. धाईत, एस. एम. रॉय, एम. डी. सहारे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी व्ही. एस. महल्ले, वरिष्ठ लिपीक पी. डी. कोसारे, कनिष्ठ लिपीक नेताजी करंबे, सुधाकर भिसे, विनायक सहारे, मेश्राम, राहूल रोकडे, संतोष चलाख, आर. एस. लहानगडे यांनी सहकार्य केले.