पीएसआयला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना सश्रम कारावास
By Admin | Published: July 2, 2016 01:40 AM2016-07-02T01:40:57+5:302016-07-02T01:40:57+5:30
अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या ...
चार्मोशी: अटक वारंटची तामिली करण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना चामोर्शीच्या न्यायालयाने शुक्रवारी एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये गंडर ऊर्फ हरिमोहन हजारी हलधर (३१), मिरीनल विमल सिकदार (३३), जयदेव ओबिला मंडल (६३), गौतम महानंदा मंडल (४१), पप्पू गुरूपद भक्तो (२३), पंकज अर्जुन सरकार (३६), शंकर हजारी हलधर (४२) सर्व रा. सुभाषग्राम ता. चामोर्शी यांचा समावेश आहे.
मारहाण केल्यानंतर कुलूपबंद खोलीत ठेवल्याबाबतची तक्रार घोटचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत बोराडे, हेमराजसिंह राजपूत यांनी केला. आरोपींविरोधात त्यांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ध. ज. पाटील यांनी या प्रकरणात एकूण १४ साक्षदारांचे बयान नोंदविले. दोन्ही बाजुकडील वकीलांचा युक्तीवाद ऐकून त्यांनी सातही आरोपींना भादंविचे कलम १४३, १४७, ३३२, ३४२, १८६ व १४९ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. डी. व्ही. दोनाडकर यांनी काम पाहिले.
असा घडला प्रकार
घोट पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण शिंदे हे दुधकुमार बॅनर्जी यांच्या नावाने निघालेल्या अटक वारंटची तामील करण्यासाठी ४ एप्रिल २०१० रोजी सुभाषग्राम येथे शासकीय वाहनाने कर्मचाऱ्यांसोबत गेले. हरिमोहन हलदर यांच्या घरी गेल्यावर तेथे ग्रा.पं.ची निवडणूक असल्याने आरोपींनी पीएसआय शिंदे व कर्मचारी शेडमाके यांना घेराव करून मारहाण केली. त्यानंतर कुलूप लावून खोलीत बंद केले. तसेच शिंदे यांच्या हातातील बॅनर्जी यांचा अटक वारंट हरिमोहन हलदर याने फाडला.