‘त्या’ परिसरात यापूर्वीही गेला होता सात कलावंतांचा जीव; वीज पडल्याच्या घटनेमुळे स्मरण
By दिगांबर जवादे | Published: April 25, 2023 02:51 PM2023-04-25T14:51:25+5:302023-04-25T15:58:56+5:30
झाडीपट्टी रंगभूमीवर शाेककळा
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील तुळशी फाट्याजवळ एका झाडाच्या खाली थांबलेल्या राजगडे कुटुंबावर साेमवारी वीज काेसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अख्खा गडचिरोली जिल्हा शोकसागरात बुडाला. विशेष म्हणजे, या घटनेच्या परिसरातच ११ वर्षांपूर्वी काळीपिवळी वाहनाला अपघात झाला हाेता. त्यात झाडीपट्टी रंगभूमीचे सात कलावंत व चालक जागीच ठार झाले होते.
देसाईगंज तालुक्यातील आमगाव बुटी येथील भारत राजगडे त्यांची पत्नी अंकिता, मुलगी देवांशी व मनस्वी हे चौघे जण कुरखेडा तालुक्यातील गळगला येथील लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत जात होते. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने तुळशी फाट्याजवळच्या एका झाडाखाली थांबले. वीज कोसळल्याने चौघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे, याच परिसरात १६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाडीपट्टी रंगभूमीचे सात नाट्यकलावंत व चालक ठार झाला होता.
अवघ्या तीन किलोमीटरवर होते गाव, तेवढ्यात नियतीने साधला डाव
कुरखेडा तालुक्यातील देवसरा येथे नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. देसाईगंज येथून काळीपिवळी घेऊन ११ कलावंत देवसराकडे रात्री दहा वाजता निघाले होते. नाटकस्थळी पोहोचण्यास उशीर होणार असल्याने काळीपिवळी वेगात होती. तुळशी फाट्याजवळ विरुद्ध बाजूने ट्रक येत होता. या ट्रकचा उजवा लाइट सुरू होता तर डाव्या बाजूचा लाइट बंद होता. त्यामुळे दुचाकी असावी, असा चालकाचा अंदाज झाला व काळीपिवळीने ट्रकला जोरदार धडक दिली.
हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...' भारत राजगडेंचे स्वर झाले मुके, चाहत्यांना धक्का
या घटनेत प्रा. उन्मेश जवळे, शेषराव मोहुर्ले, मोहन धांडे, निखिल मत्ते, वासुदेव नेवारे, दुर्वास कापगते, अविनाश गेडाम हे सात कलावंत व काळीपिवळी चालक बापू येनुरकर हे जागीच ठार झाले. या अपघातात अनिल नाकतोडे, सुधीर पाल, प्रदीप नारनवरे हे कलावंत वाचले. अतिशय चांगले कलावंत गमावल्याने झाडीपट्टी रंगभूमीला याचा मोठा फटका बसला. तर सोमवारी झालेल्या घटनेमुळे अकरा वर्षांपूर्वीच्या घटनेचे स्मरण झाले.