सात कंत्राटी अभियंत्यांना मुदतवाढीची प्रतीक्षा
By admin | Published: December 30, 2015 01:58 AM2015-12-30T01:58:05+5:302015-12-30T01:58:05+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत सात कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयामार्फत मुदतवाढ देण्यात आली नाही.
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत सात कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयामार्फत मुदतवाढ देण्यात आली नाही. या अभियंत्याची सेवा समाप्त होण्याच्या मार्गावर असल्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या एकूण ५१० कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने विषयतज्ज्ञ व कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विषय तज्ज्ञाला ११ महिने कालावधीचा नियुक्ती आदेश दिला जातो. तर अभियंत्यांना वर्षातून दोनदा सहा महिन्याच्या कालावधीचे नियुक्ती आदेश दिले जाते. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानात कार्यरत सात कनिष्ठ अभियंत्याच्या सेवेची मुदत सप्टेंबर २०१५ अखेर संपलेली आहे. मात्र जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार या सात कनिष्ठ अभियंत्यांना कामावर ठेवले आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने वर्ग खोली, नवीन प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम किचन शेड व स्वच्छतागृह मिळून एकूण ३६१ कामे सुरू आहेत. याशिवाय राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत प्रयोगशाळा, वर्गखोलीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून व मुलींच्या वसतिगृहांचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळांचे संरक्षण भिंती व शाळा दुरूस्तीचे मिळून एकूण १४२ कामे सुरू आहेत. अतिरिक्त केंद्र सहाय्य योजनेंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इमारत दुरूस्ती व सोलर सिस्टिमचे काम सुरू आहे. जि.प. अंतर्गत एकूण ५१० कामे सुरू असून निधी समायोजनाचे काम शिल्लक आहे. कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला मुदतवाढ न मिळाल्यास यंत्रणेअभावी जि.प. शाळांचे कामे प्रभावित होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)