गडचिरोली नगर परिषदेतील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: June 2, 2017 12:53 AM2017-06-02T00:53:24+5:302017-06-02T00:53:24+5:30
गडचिरोली नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांच्या ३१ मे रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बदल्या नगर विकास विभागाचे सहायक संचालक यांनी केल्या आहेत.
नगर परिषदेत आरोग्य पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रणाली दुधबळे यांची बदली देसाईगंज नगर पालिकेत झाली आहे. संगणक पर्यवेक्षक सुरेश क्षिरसागर यांची बदली देसाईगंज नगर परिषदेत झाली आहे. कनिष्ठ अभियंता सुरेश पुनवटकर यांचे स्थानांतरण वरोरा नगर परिषदेत तर कनिष्ठ अभियंता उमेश शेंडे यांचे स्थानांतरण गोंदिया नगर परिषदेत झाले आहे. कर निरिक्षक सुरेश भांडेकर व शिक्षण विभाग प्रमुख ध्रुपनाथ मेश्राम यांचे मूल येथे तर भांडारपाल रमेश वसंतराव धकाते यांचे ब्रह्मपुरी नगर परिषदेत स्थानांतरण झाले आहे.
नगर परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय ११ मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला. त्याची अंमलबजावणी मे महिन्यातच करण्यात आली. यापूर्वी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या. ३१ मे रोजी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर १ जून रोजी त्यांचे बदली आॅर्डर मेलच्या सहाय्याने संबंधित नगर परिषदेत पाठविण्यात आले. त्या कर्मचाऱ्यास १ जून रोजी भारमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गडचिरोली नगर परिषदेत अगोदरच अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यातही अनुभवी कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी स्थानांतरण झाले असल्याने प्रशासन चालविण्यास चांगलीच कसरत होणार आहे.