नऊ गावातील दीडशे हेक्टर जमिनीला बसणार फटका
By admin | Published: November 12, 2016 02:06 AM2016-11-12T02:06:53+5:302016-11-12T02:06:53+5:30
तेलंगणा राज्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील नऊ गावातील दीडशे हेक्टर
मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प : सिरोंचात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी
सिरोंचा : तेलंगणा राज्यातील मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील नऊ गावातील दीडशे हेक्टर जमिनीला फटका बसणार आहे. यामध्ये शासकीय व खासगी जमिनीचा समावेश आहे. दीडशेपैकी केवळ ५० हेक्टर जमीन या सिंचन प्रकल्पाने पाण्याखाली येणार आहे. मात्र या सिंचन प्रकल्पाने नऊ गावातील एकाही घराचे मुळीच नुकसान होणार नाही, अशी माहिती सिरोंचा तहसील कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या जनसुनावणीत देण्यात आली.
मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गैरसमज पसरले होते. सदर संभ्रम दूर करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी नायक यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात जनसुनावणीची सभा सुरू करण्यात आली. यावेळी सभागृहात प्रचंड गर्दी होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही मोजक्या लोकांना आत बोलावून तहसीलदाराच्या सभागृहात त्यांची बैठक घेतली. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे पाणी मागच्या दिशेने (बॅक वॉटर) ५० किमी अंतरापर्यंत जाणार असून सदर पाणी नदीपात्रात राहणार असल्याने नऊ गावाच्या जमिनीला फटका बसणार आहे. यामध्ये पोचमपल्ली, वडधम, आईपेठा, तूमनूर, पेंटीपाका, आरडा, मृदूक्रिष्णापूर, लंबडपल्ली आदी गावांचा समावेश आहे. सदर नऊ गावातील कमीतकमी जमीन पाण्याखाली जावी, असा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सिंचन प्रकल्पाशी संबंधित अभियंत्यांनी यावेळी लोकांना दिली. सिंचन प्रकल्पाचे एक मीटरपर्यंत खालच्या भागात बांधकाम राहणार. नंतर १० मीटर उंचीपर्यंत गेट राहणार आहेत. त्यामुळे बॅक वॉटरची समस्या उद्भवणार नाही. नदी पात्रात चार किमी पर्यंतचा बांध राहणार असून पाणी पातळी रेतीपासून १२ मीटर राहणार आहे. सदर सिंचन प्रकल्पामुळे नऊ गावातील २०० सर्वे नंबरधारकांची जमीन पाण्याखाली येणार आहे. मात्र यात तीन गावांचे सर्वात जास्त जमीन पाण्याखाली येणार असून सहा गावांना फारसा फटका बसणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक व सिंचन प्रकल्पाचे तेलंगणा येथील मुख्य अभियंते व्यंकटेश्वरलू यांनी यावेळी दिली.
येत्या काही दिवसात कोणत्या शेतकऱ्यांच्या किती जमिनी जाणार हे शेतकऱ्यांच्या नावासह तहसील कार्यालय व त्या-त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नोटीस बोर्डावर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी नदीच्या पूरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेले आहेत, सध्या तिथे जमिनी नाहीत. परंतु सातबारावर तशी नोंद असल्यास त्या वाहून गेलेल्या जमिनीचे सुध्दा या सिंचन प्रकल्पामुळे नुकसान होत असल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देताना शासकीय दर न लावता शेतकऱ्यांशी चर्चा करून जे खासगी बाजारभाव राहतील, त्यानुसार मोबदला दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता सुधाकर रेड्डी, ओंकार सिंग, सुरेश कुमार, टी. सुरेश, सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)