अवैध रेती उपसा करणाऱ्यावर ठोठावला सात लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:55 PM2019-02-22T23:55:20+5:302019-02-22T23:55:38+5:30
देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीवरील अरततोंडी घाटावरून सुमारे ४८.३० ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करणाºया ट्रॅक्टर मालकावर देसाईगंज तहसीलदारांनी सुमारे ७ लाख २३ हजार ७० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील गाढवी नदीवरील अरततोंडी घाटावरून सुमारे ४८.३० ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करणाºया ट्रॅक्टर मालकावर देसाईगंज तहसीलदारांनी सुमारे ७ लाख २३ हजार ७० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
शैलेश दिगांबर नाकाडे रा. उसेगाव असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. अरततोंडी रेती घाटावरून रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंजचे तहसीलदार डी. टी. सोनवाने व नायब तहसीलदार आर. डी. नैताम यांच्या पथकाने १५ फेब्रुवारी रोजी अरतोंडी येथील रेती घाटाला पहाटे ५ वाजता आकस्मिक भेट दिली असता, एमएच ३३ एफ ४९३९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. ट्रालीवर क्रमांक नव्हता. केवळ युवराज असे लिहिले होते. वाहन चालक राष्ट्रपाल युवराज प्रधान रा. शिवराजपूर याला विचारणा केली असता, सदर ट्रॅक्टर उसेगाव येथील शैलेश दिगांबर नाकाडे यांच्या मालकीची असल्याचे सांगितले. रेती वाहतुकीची ही तिसरी ट्रीप असल्याचे कबूल केले.
नदी पात्रातून रेतीचे खनन केलेल्या ठिकाणाचे पंचासमक्ष मोजमाप केले असता, मोजमापाअंती एकूण ४८.३० ब्रास रेतीचे उत्खनन केल्याचे दिसून आले. या प्रकरणी शैलेश नाकाडे यांना नोटीस देण्यात आली. नाकाडे यांनी सदर ट्रॅक्टर आपल्या मालकीचा असून मोजमापानुसार ४८.३० ब्रास रेतीचे खनन आपण केल्याचे कबूल केले. गौण खनिजाच्या बाजार मुल्याच्या पाच पट दंडाची रक्कम १२ हजार ५०० रुपये व स्वामित्वधनाची ४०० रुपये असा एकूण ४८.३० ब्रास करिता ६ लाख २३ हजाराचा दंड ठोठावला. तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. असा एकूण ७ लाख २३ हजार ७० रुपयांचा दंड ठोठावून रक्कम शासनजमा करण्याचे आदेश दिले.
दामदुपटीने रेतीची विक्री
रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. सुमारे चार ते पाच हजार रुपये ब्रॉस रेती विकली जात आहे. रेती घाटावर ट्रॅक्टर नेण्यामध्ये जास्त धोका असल्याने काही रेती तस्कर बैलबंडीच्या सहाय्याने रेती आणत आहेत. बैलबंडी मालकांना केवळ ३०० रुपये दिले जातात. त्यानंतर गोळा झालेली रेती सुमारे चार ते पाच हजार रुपये दराने विकली जात आहे.