दहापैकी सात जणांना बायकाेचाही माेबाइल नंबर पाठ नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:56+5:302021-07-14T04:41:56+5:30
गडचिराेली : धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती एवढी व्यस्त झाली आहे की, त्यांना लहानसहान गाेष्टींमध्ये वेळ द्यायला सवड मिळत नाही. ...
गडचिराेली : धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती एवढी व्यस्त झाली आहे की, त्यांना लहानसहान गाेष्टींमध्ये वेळ द्यायला सवड मिळत नाही. तरीसुद्धा मोबाइलवर अधूनमधून ते आपली करमणूक करून घेत असतात. अलीकडे डायरी किंवा नाेट वापरण्याची पद्धत कमी झाली. तसेच माेबाइलमध्ये शेकडो नंबर सेव्ह होत असल्यामुळे कोणीही मोबाइल नंबर पाठ करीत नाही. याबाबत गडचिराेली शहरातील तीन चाैकात दहा जणांना त्यांच्या घरातील व्यक्तींसह बायकाेचा मोबाइल नंबर विचारला असता त्यातील सात जणांना तो सांगता आला नाही, ही बाब ‘लोकमत’ने साेमवारी केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून समोर आली.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बरीच प्रगती झाली आहे. तंत्रज्ञानाचा वापर व्यक्ती आपल्या गरजा भागविण्यासाठी तसेच चैनीसाठी करू लागला. विविध प्रकारची यंत्रे ताे हाताळू लागला. यात माेबाइलचाही समावेश आहे. प्रत्येकाच्या हातात ॲण्ड्राॅइड मोबाइल आले. त्याची क्षमतादेखील बऱ्यापैकी असल्याने मोबाइल नंबर सेव्ह करायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परिणामी, शेकडो मोबाइल नंबर त्या एकाच मोबाइलमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे शक्यतो कोणीही मोबाइल नंबर पाठ करीत नाही. ज्यांच्याशी कायम संपर्क असतो त्यांचा मोबाइल नंबर मात्र पाठ आहे; मात्र ताे माेबाइलमध्ये सेव्ह केलेला आहे. वारंवार की-पॅडचे बटन दाबण्यापेक्षा ताेसुद्धा सेव्ह केल्याचे दिसून आले. बहुतांश नागरिकांना तर आपल्या घरच्या व्यक्तींचाही माेबाइल क्रमांक पाठ नसल्याचे दिसून आले.
‘अ’ डायरी बाळगणे साेडल्याने आता माेबाइल क्रमांक पाठ करण्याची गरज नाही, असे म्हणाले.
‘ब’ व्यक्तीने घरात दोन मोबाइल असल्याने ते दोन्ही नंबर मोबाइलमध्ये सेव्ह केले असल्याचे सांगितले.
‘क’ घरातील मोबाइल क्रमांकाचे सुरुवातीचे चार अंक सांगता आले. नंतरचे अंक मात्र सांगता आले नाहीत.
‘ड’ व्यक्तीला स्वतःचा नंबर सांगता आला; मात्र घरातील इतरांचे मोबाइल नंबर पाठ नसल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत बहुतांश सारखेच
माेबाइल क्रमांक पाठ आहे काय? याबाबत विचारले असता काही व्यक्ती वगळता एकालाही घरातील सदस्यांचा मोबाइल नंबर अचूक सांगता आला नाही. एकंदरीत पाहता तरुणांपासून वृद्धांपर्यंत जवळपास सर्वच जणांची स्थिती सारखीच असल्याचे दिसून आले. आता सर्वांकडेच स्मार्टफोन असल्याने जास्तीतजास्त वेळ साेशल मीडियाचा वापर करण्यात जाताे. फोनमध्ये नंबर सेव्ह केले जात असल्याने नंबर लक्षात ठेवण्याकडे फारसे कोणी लक्षच देत नाही. अनेक जण ड्युअल सिमचा वापर करतात. त्यामुळे बहुतांश बायकांनाही पतीचा केवळ एकच नंबर आठवल्याचे दिसून आले.
काेट
माेबाइलमुळे बायकांनाही नंबरची विस्मृती
मी मागील ८ वर्षांपासून स्मार्ट फोन वापरत आहे. मला माझा मोबाइल नंबर पाठ आहे. मात्र, पतीचा केवळ एकच मोबाइल नंबर पाठ आहे. मोबाइलमध्ये नंबर सेव्ह राहात असल्याने दुसरा नंबर पाठ करण्याची गरजच पडत नाही. परंतु एका डायरीमध्ये महत्त्वाचे बहुतांश नंबर लिहून ठेवले आहेत. त्यामुळे पाठ करण्याच्या भानगडीत पडली नाही.
एक गृहिणी
अविवाहित असतानाच माझ्याकडे ॲण्ड्राॅईड माेबाइल आला. त्यामुळे इंटरनेट व साेशल मीडिया पाहात राहण्याची सवय मला लागली. माेबाइलमध्ये नातेवाईक व घरातील व्यक्तींचे मोबाइल नंबर सेव्ह केले आहेत. आवश्यकता पडल्यानंतर सर्च करून काॅल केला जाताे. नवीन माेबाइल क्रमांक घेताना मोबाइलमध्येच सेव्ह केला जाताे.
एक गृहिणी
पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ
शाळेत दाखल झाल्यापासून आई-बाबांचा मोबाइल नंबर शिक्षक मागतात. सुरुवातीला माेबाइल क्रमांक वहीवर लिहून ठेवला हाेता. त्यानंतर ताे वारंवार सांगून पाठ झाला. शाळेच्या डायरीवरही मोबाइल क्रमांक लिहून ठेवला होता. त्यामुळे आई-बाबा दोघांचाही नंबर पाठ करून ठेवला आहे.
जुही वाघमारे, विद्यार्थिनी
शाळेत माेबाइल बाळगणे बंदी आहे. तरीसुद्धा आम्ही माेबाइलचा वापर करताे. शाळेत माेबाइल बंद करून ठेवताे. संपर्कात राहावे यासाठी वडिलांनी मोबाइल खरेदी करून दिला. बाहेर जाताना तो माझ्यासोबत ठेवतो. माझ्याकडे माेबाइल असला तरी मला आई-बाबांचा नंबर पाठ आहे.
विपिन देशमुख, विद्यार्थी
बाॅक्स
पाठांतराच्या सवयीमुळे मुलांना सहज शक्य
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना पाठांतर करण्याची सवय असते. याशिवाय त्यांची स्मृती तेज असते. त्यामुळे मुले काेणतीही बाब लवकर पाठांतर करतात. त्यांची स्मृती लवकर सदर बाबी ग्रहण करतात. विविध कामांच्या ताणामुळे प्रौढ व्यक्तींना पाठांतर करण्यात अडचणी येतात. त्यामुळे नंबर लक्षात राहात नाहीत. लहान मुलांचे वय हे शिकण्याचे असते. पाठांतराच्या सवयीमुळेच मुलांना माेबाइल क्रमांक लवकर पाठ हाेतात.