सात हजार लाभार्थ्यांवरच पेन्शन योजना अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:36+5:30
खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : असंघटित क्षेत्रातील कामगार, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाला पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना २०१५ मध्ये सुरू केली. शासनाच्या दबावामुळे सुरूवातीला या योजनेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी या योजनेत सहभागी झाले. त्यानंतर मात्र शासन व प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने आता या योजनेचा विस्तार कमी झाला आहे. जिल्हाभरातील केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ घेतला आहे.
खासगी क्षेत्रात सेवा देणाऱ्या तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराला कामबंद होताच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. या वर्गाला वयोवृध्द कालावधीत थोडाफार आर्थिक स्त्रोत मिळत राहिल्यास त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीचे बँक खाते आहे, अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील असंघटीत क्षेत्रातील नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वार्षिक ४२ रुपये ते १४५४ रुपये असा लाभार्थीच्या वयानुसार हप्ता ठरतो.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र शासनाचा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बराच दबाव होता. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला बँकेचे कर्मचारी योजनेविषयी माहिती देत होते. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे सुध्दा योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कामाला लागले होते. २०१५ नंतर भाजप सरकारने अनेक योजना सुरू केल्या. त्या योजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले. अटल पेन्शनकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्यावर मर्यादा येत आहेत. मागील चार वर्षाच्या कालावधीत या योजनेचा लाभ केवळ ७ हजार ४०५ लाभार्थ्यांनी घेतला आहे.
योजनेच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचे दिसून येते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत चांगली योजना आहे. मात्र योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक हप्ता केवळ ४२ रुपये ते १४५४ रुपये एवढा भरायचा आहे. १८ ते ४० या वयोगटातील नागरिक या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. वयानुसार हप्त्याची रक्कम बदलते. जेवढे वय अधिक तेवढी हप्त्याची रक्कम अधिक राहते. लाभार्थ्याला ६० वर्ष वयानंतर मासिक एक हजार रुपये ते पाच हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रुपये दिले जातील.