जिल्ह्यात सात हजार नागरिक हत्तीरोगाने पीडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:34+5:30
हत्तीरोग क्युलेक्स या प्रकरातील डास चावल्यामुळे होतात. सदर डास बुचेरेरीया बॅनक्रॉप्टीया हे परजीवी जंतू मनुष्याच्या शरीरात चावा घेतेवेळी सोडतो. अशा प्रकारे हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतंूनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ८ ते १६ महिन्यांच्या कालावधीनंतर लक्षणे दिसायला लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा हत्तीरोग कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हत्तीरूग्णांची (फायलेरीया) संख्या सुमारे ६ हजार ८८९ एवढी आढळून आली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरूग्णांची संख्या अधिक असल्याने आरोग्य विभागही चिंतेत पडला आहे.
हत्तीरोग क्युलेक्स या प्रकरातील डास चावल्यामुळे होतात. सदर डास बुचेरेरीया बॅनक्रॉप्टीया हे परजीवी जंतू मनुष्याच्या शरीरात चावा घेतेवेळी सोडतो. अशा प्रकारे हत्तीरोगाचे जंतू मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. हत्तीरोगाच्या संसर्गजन्य जंतंूनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ८ ते १६ महिन्यांच्या कालावधीनंतर लक्षणे दिसायला लागतात.
हत्तीपायाचे लक्षणे दिसण्याच्या चार अवस्था मानल्या जातात. पहिल्या अवस्थेत जंतूचा शिरकाव झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लक्षणे दिसून येतात. दुसऱ्या अवस्थेत रूग्णाच्या रात्रीच्या रक्तनमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र रूग्णामध्ये या रोगाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाही. तिसºया अवस्थेत ताप, रसीकाग्रंथींना सूज दिसून येते. चौथ्या अवस्थेत हात, पाय व बाह्य जनिंद्रीयावर सूज दिसून येते.
हत्तीरोग व मलेरिया हे डासांनी होणारे आजार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण डासांसाठी पोषक असल्याने या दोन्ही रोगांचे रूग्ण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक अनेक उपाय केले जातात.
यामध्ये मच्छरदाण्यांचे वितरण करणे, फवारणी करणे, गप्पी मासे सोडणे, आदींचा समावेश आहे. या सर्व उपायानंतरही मलेरिया व फायलेरिया या रोगांच्या रूग्णांमध्ये भरच पडत चालली आहे. जिल्हा हत्तीरोग अधिकारी कार्यालयाच्या वतीने १५ ते ३० जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले होते. या कालावधीत जुने व नवीन असे एकूण ६ हजार ८८९ रूग्ण आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक
हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. यामध्ये घरासभोवताल तसेच गावात डासांची पैदास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेणे. घाण, कचरा यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे. खड्डे, सखल जागा मातीचा भराव टाकून बुजविणे. डासांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा हत्तीरोग विभाग तसेच आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात असली तरी नागरिक योग्य ती उपाययोजना करीत नसल्याने जिल्ह्यात फायलेरिया रूग्णांची संख्या अधिक आढळते. हत्तीरोग होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांना वर्षातून एकदा डीईसी गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांचे प्रत्येक नागरिकाने सेवन करणे आवश्यक आहे.
हत्तीरोग झालेल्या व्यक्तीचा पाय सूजतो तर काही नागरिकांची अंडवृध्दी होते. अंडवृध्दी झालेल्या नागरिकांचे ऑपरेशन करता येते. अंडवृध्दी झालेल्या नागरिकांनी ऑपरेशनसाठी जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात संपर्क साधावा.
- डॉ. कुणाल मोडक,
जिल्हा हत्तीरोग नियंत्रण अधिकारी, गडचिरोली