सात ट्रक व तीन पोकलँड मशीन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 06:00 AM2019-11-30T06:00:00+5:302019-11-30T06:00:29+5:30
मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी काढल्या होत्या. मात्र रात्रीच्या सुमारास ते अवैधपणे नदी पात्रातून रेती उपसून जुन्या रेतीच्या ढिगावर टाकत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : जयरामपूर नदी घाटातून रेतीची तस्करी करणारे सात ट्रक व तीन पोकलँड मशीन आष्टी पोलिसांनी धाड टाकून जप्त केले आहेत.
मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी काढल्या होत्या. मात्र रात्रीच्या सुमारास ते अवैधपणे नदी पात्रातून रेती उपसून जुन्या रेतीच्या ढिगावर टाकत होते. मागील अनेक दिवसांपासून अशा प्रकारे रेतीची चोरी होत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर जयरामपूरच्या महिला तलाठी एल. एस. होळी यांनी आष्टी पोलिसांची मदत घेऊन शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धाड टाकली. सातही ट्रक रस्त्याच्या बाजुला उभे होते. त्यामध्ये रेती भरली होती. त्यांच्याकडे रेतीचा वाहन परवाना आढळून आला नाही. तसेच नदी पात्रात दोन पोकलँड मशीन आढळल्या. एक पोकलँड मशीन झुडूपाआड लपवून ठेवण्यात आला होता. तिन्ही पोकलँड मशीन व हायवा ट्रक जप्त केले. तसेच या प्रकरणी शाहरूख इजराईल शेख (३३) रा. संजयनगर चंद्रपूर शाच्यासह सात चालकांना ताब्यात घेतले. सदर रेती घाटकूळ-पोंभुर्णा मार्गे चंद्रपूरला नेली जात होती. मागील अनेक दिवसांपासून अशा पध्दतीने रेतीची तस्करी होत होती. मात्र याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केले होते, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. ट्रक व पोकलँड जप्त करण्यात आले आहे. त्यावर महसूल विभाग कोणती कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सदर कंत्राटदाराला अभय असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
सदर कारवाई आष्टीचे पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, एस. सी. किरमिरवार, सहायक पोलीस उपनिरिक्षक संघरक्षीत फुलझेले, एच. आर. वैरागडे, पंचफुलीवार, शिपाई शैलेंद्र मुढाई यांनी केली.
या ट्रकचालकांना घेतले ताब्यात
प्रशांत बालाजी झरतकर, अन्सर अमजद खान पठाण, अंकूश अशोक सोनटक्के, रमेश सत्यवान पोघे, शामराव पोचम बब्बरवार, प्रशांत पंढरी रामटेके, गणेश शामराव लेनगुरे सर्व रा. चंद्रपूर या ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. तसेच व्यवस्थापक शाहरूख इजराईल शेख, पोकलँड चालक लवकुश बांगरे, बालाजी व्यंकटी गायकवाड व खान या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच एमएच ३४ बीजी ६४६३, एमएच ३४ एम ६२३३, एमएच ३४ बीजी ६५४२, एमएच ३४ बीजी २२१२, एमएच ३४ बीजी २२१३, एमएच ३४ एबी ३८९९, एमएच ३४ बीजी २२१६ क्रमांकाचे ट्रक जप्त केले आहेत.
नदीपात्राचे मोजमाप करा
नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात आली आहे. आजपर्यंत किती रुपयांची रेती चोरी झाली, हे ठरवून कंत्राटदाराविरोधात दंड ठोठावण्यासाठी नदी पात्रातील रेती उपशाचे मोजमाप होणे आवश्यक आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.