बलात्कार प्रकरणात आरोपीस सात वर्षांची शिक्षा
By Admin | Published: July 31, 2015 01:46 AM2015-07-31T01:46:20+5:302015-07-31T01:46:20+5:30
गावाकडे जाण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील नान्ही फाट्यावर बसची वाट बघत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावी सोडून देतो,
अल्पवयीन मुलगी : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये झाला कारावास
गडचिरोली : गावाकडे जाण्यासाठी कुरखेडा तालुक्यातील नान्ही फाट्यावर बसची वाट बघत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावी सोडून देतो, असे सांगून तिच्या गावी न सोडता जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस गुरूवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. धर्मेंद्र कवडू उईके (२४) रा. नान्ही ता. कुरखेडा असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी ४ जानेवारी २०१४ रोजी नान्ही फाट्यावर सायंकाळी बसची वाट बघत होती. दरम्यान धर्मेंद्र उईके त्या ठिकाणी आला. त्याने सदर अल्पवयीन मुलीला तुझ्या गावी सोडून देतो, असे आश्वासन दिले. धर्मेंद्रच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी त्याच्या दुचाकीवर बसली. त्यानंतर धर्मेंद्रने दुचाकी शिरपूर गावाच्या जंगलाच्या मार्गाने नेले. जंगलात नेल्यानंतर तिच्यावर शारीरिक संभोग केला. त्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या चारचाकी वाहनाने मुलीला ब्रह्मपुरी येथे नेले. मात्र त्या ठिकाणी लॉज उपलब्ध न झाल्याने तिला देसाईगंज येथील हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये जेवन केल्यानंतर त्याच रात्री तिला नान्ही येथील धर्मेंद्रच्या मित्राच्या घरी नेले. तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ जानेवारी रोजी तिला घरात डांबून ठेवण्यात आले. ५ जानेवारी रोजी आणखी तिच्यावर बळजबरी केली. काही वेळानंतर तिला कुरखेडा येथील श्रीराम वार्डात सोडून देण्यात आले. झालेला सर्व प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानुसार तिच्या वडिलाने ६ जानेवारी कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा गुरूवारी निकाल लागला असून अप्पर सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी आरोपी धर्मेंद्र उईके याला सात वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सरीता ताराम यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)