सतराशे ज्येष्ठांची नेत्रचिकित्सा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:01 PM2017-09-15T23:01:07+5:302017-09-15T23:01:17+5:30
चामोर्शी ग्रामीण रूग्णालय, नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व नेत्र रूग्णालय, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती व चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर....
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी ग्रामीण रूग्णालय, नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी व नेत्र रूग्णालय, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समिती व चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर आ. डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या पटांगणात शुक्रवारी घेण्यात आले. या शिबिरात १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरगंटे, पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, विनोद गौरकार, नगरसेवक प्रशांत एग्लोपवार उपस्थित होते.
तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांना मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेता यावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आल्याने गरजूंना लाभ मिळाला. यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. शिबिरात नागपूर येथील महात्मे नेत्र रूग्णालयाचे डॉ. अरविंद डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकन्या गोरे, अंकित लांजेवार, महेश राहूलवार, आकाश मलकापुरे, विशाल, कमल मडावी तसेच चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ चिटकुले यांच्या चमूने १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र चिकित्सा केली. शिबिराचे संचालन रमेश अधिकारी यांनी केले.
यशस्वीतेसाठी साईनाथ बुरांडे, माणिक कोहळे, ज्ञानेश्वर कुनघाडकर, राजू चुधरी, नरेश अल्सावार, सुनील सोरते तसेच तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
४०० रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड
चामोर्शी येथे शुक्रवारी पार पडलेल्या नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञांच्या चमूने १ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र चिकित्सा केली. यापैकी ४०० नेत्र रूग्णांची नेत्र शस्त्रक्रियेकरिता निवड झाली आहे. यातील रूग्णांना टप्प्याटप्याने नागपूर येथील महात्मे नेत्र रूग्णालयात शस्त्रक्रियेकरिता पाठविले जाणार आहे. गरीब व गरजू नेत्र रूग्णांना आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने आयोजित शिबिरामुळे लाभ मिळाला आहे.