सातबाराची साईट अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:03 AM2018-06-08T01:03:13+5:302018-06-08T01:03:13+5:30
मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील आठ दिवसांपासून बंद असलेली आॅनलाईन सातबारा मिळण्याची साईट सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे तलाठ्याकडून शेतकऱ्यांना सातबाराचे वितरण केले जात आहे.
पीक कर्ज घेणे, खत खरेदी तसेच इतर कामांसाठी सातबाराची गरज भासते. खरीपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सातबाराची मागणी वाढली आहे. अशातच मागील १० दिवस आॅनलाईन सातबाराची साईट बंद होती. त्यामुळे शेतकºयांना सातबारा उपलब्ध होत नव्हता. सातबारासाठी तलाठ्याकडे आलेल्या शेतकऱ्याला निराश होऊन परत जावे लागत होते. सातबारा न मिळाल्याने काही शेतकऱ्यांचे पीक कर्ज मिळण्यासही अडचण निर्माण झाली होती. मात्र आॅनलाईन सातबाराशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी व तलाठी सुध्दा हैराण झाले होते. सोमवारपासून मात्र सातबाराची साईट सुरू झाली आहे. तलाठ्याचे लॉगीन आयडी टाकल्यानंतर सातबारा उपलब्ध होत आहे. सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यांकडे शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. सातबारा देण्याबरोबरच फेरफार, नमुना ८ अ देण्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे.
आपले सरकार येथून सुध्दा सातबारा उपलब्ध होतो. मात्र सदर साईट अजुनही बंद असल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा महाआॅनलाईनच्या सेतू केंद्रातून सातबारा मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना सातबारासाठी तलाठ्यांकडेच जावे लागत आहे. तलाठ्यांकडून सातबारा उपलब्ध होण्यास सुरूवात झाल्याने शेतकºयांची गैरसोय थांबली आहे. खरीप हंगामापूर्वी विविध कामांसाठी शेतकऱ्यांकडून सर्वाधिक सातबाराची मागणी होते. साईटमध्ये काही बदल करायचा असल्यास तो खरीपाच्या हंगामानंतर करावा. यानंतर खरीप हंंगाम संपेपर्यंत साईट बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सेतू केंद्रातील समस्या कायम
भूअभिलेख, आपले सरकार या पोर्टलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र, महाआॅनलाईनच्या सेवा केंद्रावरूनही सातबारा काढता येतो. मात्र सदर पोर्टल अजुनही सुरू झाले नाही. त्यामुळे या पोर्टलवरून सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. शेतकरी जवळपासच्या केंद्रात जाऊन सातबारा विषयी विचारणा करीत आहेत. मात्र साईट बंद असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. १५ जूनपर्यंत पीक कर्ज देण्याची मुदत असल्याने शेतकरी वर्ग सातबारासाठी गर्दी करीत आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.