तीव्र पाणीटंचाईची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:15 AM2019-03-31T00:15:06+5:302019-03-31T00:15:58+5:30
मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मागील खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अंतिम टप्प्यात धानपिकाला तलाव, बोड्या, नदी, नाल्याचे पाणी द्यावे लागले. येथील जलसाठा घटला. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झपाट्याने जलपातळी घटली. याचा परिणाम आता दिसून येत आहे. तालुक्यातील नदी काठालगतच्या अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण व्हायची. परंतु यंदा मार्च महिन्यापासूनच टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच लहान नाले, तलाव आटायला सुरूवात झाली. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीतील जलपातळी झपाट्याने घटत आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील पाच ते सहा गावांना पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच बसत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चामोर्शी जवळील चिचडोह बॅरेज बांधून पाणी अडविण्यात आल्यामुळे बॅरेजच्या उतार भागात असलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनांना मुबलक पाणी पुरवठा होईल, अशी शक्यता दिसून येत नाही. आतापासूनच या नळ योजनांची जलपातही अतिशय खाली गेली आहे. भेंडाळा, वाघोलीसह परिसरातील तीन ते चार गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया नळ योजनांच्या विहिरीतील जलपातळी खाली गेल्याने गावात केल्या जाणाºया पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुन्हा उन्हाळ्याची दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे अशा स्थितीत या भागात पाणीटंचाई तीव्र होईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. बॅरेजच्या खालील भागात असलेल्या नदीपात्रात पाणी शिल्लक नाही. परिणामी या भागातील नळ योजनांद्वारे एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
विशेष म्हणजे गावातील अनेक विहिरी व हातपंपाची पातळी अत्यंत खाली गेली आहे. यातील पाणीपातळी पुन्हा खाली गेल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. या भागातील भाजीपाला तसेच उन्हाळी धानपिकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे नव्यानेच निर्माण झालेल्या चिचडोह बॅरेजमधील पाणी कडक उन्हाळ्यात नदीच्या उतार भागात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.