सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:46+5:302021-07-20T04:24:46+5:30

अहेरी : तालुक्यातील अनेक गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास ...

Sewage disrupts health | सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित

सांडपाण्यामुळे आरोग्य बाधित

Next

अहेरी : तालुक्यातील अनेक गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यातून डासांची पैदास वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. ग्रामपंचायतीने नाल्यांची सफाई करावी, सांडपाणी वाहून नेणारा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

चामाेर्शी : जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका काेठून सुरू होतो. याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडते. या सीमावर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमा सुशोभित दिसेल. तसेच या माध्यमातून शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी

देसाईगंज : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जड वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री थांबवा

गडचिराेली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले, तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने घसरून अपघात होत आहे. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहे.

झुडपामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

धानाेरा : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, यातील बहुतांश गावातील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सरपणासाठी महिला जंगलात

घाेट : आर्थिकदृष्ट्या गॅस सिलिंडर परवडणारा नाही. तसेच रॉकेल देणेही शासनाने बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्य प्राण्यांच्या दहशतीत महिलांना जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे. त्यामुळे सिलिंडर तसेच राॅकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

एटापल्लीतील अनेक शाळा विजेविना

एटापल्ली : शासनाच्या आग्रहाखातर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहे. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविना सुरू आहेत.

दुधाळ गाईंचे वाटपास हाेत आहे दिरंगाई

आरमाेरी : बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. ते सांभाळण्यास त्रास हाेत आहे. शेतकऱ्यांना दुधाळ गाईंचे वाटप करावे, अशी मागणी आहे.

शिवभोजनाची केंद्र वाढावी

गडचिराेली : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळ्यांची संख्या मोजकीच ठेवली आहे. शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे.

तंमुस नाममात्रच

आष्टी : तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र, सद्यस्थितीत या समित्या थंडबस्त्यात आहेत. गावांमध्ये अवैध धंदे वाढत आहेत.

तांत्रिक अडचणी दूर करा

आलापल्ली : जिल्ह्यातील अनेक गावात नळ योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. तांत्रिक अडचणी अजूनही दूर झाल्या नाहीत. प्रशासनाने अडचणी दूर कराव्या.

महिलांची कुचंबणा

चामाेर्शी : ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या

धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

पीएचसीसाठी इमारत बांधण्याची मागणी

भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारती अभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णतः उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागेपल्लीचे दूध शीतकरण केंद्र सुरू करा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा

एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात. तोडसा परिसरात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने मोठी अडचण होते.

आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा

आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशू मुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्य पशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्षच आहे.

कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

अहेरी : परिसरातील गावांमध्ये मागील अनेक दिवसांपासून नाल्यांचा उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Web Title: Sewage disrupts health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.