अहेरी तालुक्यात होणार शेडनेट शेती

By admin | Published: June 24, 2017 01:24 AM2017-06-24T01:24:01+5:302017-06-24T01:24:01+5:30

आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून अहेरी तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी शेडनेट उभारले असून ....

Shadenet farming will be held in Aheri taluka | अहेरी तालुक्यात होणार शेडनेट शेती

अहेरी तालुक्यात होणार शेडनेट शेती

Next

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : बारमाही भाजीपाला उत्पादनास साह्य
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून अहेरी तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी शेडनेट उभारले असून या शेडनेटमध्ये तीनही ऋतूंमध्ये (बारमाही) भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले जाणार आहे. अशा पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे हे पहिले आदिवासी शेतकरी ठरणार आहेत.
आदिवासी नागरिकांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यात भाजीपाला पिकाच्या लागवडीस भरपूर वाव असला तरी उच्च तापमान, पर्जन्यमान व थंडी या अगदी विषम वातावरणामुळे तिनही ऋतुंमध्ये भाजीपाला टिकाव धरू शकत नाही. शेडनेटच्या माध्यमातून शेती केल्यास ती फायद्याची ठरू शकते. याची जाणीव येथील शेतकऱ्यांना असली तरी शेडनेट तयार करण्याचा खर्च लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे शासकीय अनुदानाशिवाय शेडनेट उभारणे शक्य नाही. अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी १ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून पेरमिली मंडळातील चंद्रा येथील मुसली वेलादी, कोरली (बु.) येथील वाल्हे कोच्चा कुळमेथे, ताटीगुडम येथील रामबाई मलय्या आत्राम, गंगाराम विस्तारी मडावी, मल्लेश पोच्चा सिडाम या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनात शेडनेट तयार केले आहे. या शेडनेटमध्ये शिमला मिरची, भोपळा, विविध प्रकारची फुले, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. शेडनेटमुळे तापमान, आद्रता, कार्बडाय आॅक्सिाईडचे प्रमाण निश्चित प्रमाणात राहून पिकांची वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर शेडनेटमधील पिकांवर किडीचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो. भाजीपाल्याचा दर्जा चांगला राहत असल्याने पिकांची वाढही चांगली होते.
शेडनेटद्वारे शेती हा जिल्ह्यातील सद्य:स्थिती प्रयोगच समजावा लागेल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही शेती निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

 

Web Title: Shadenet farming will be held in Aheri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.