आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटल्या जंगलातल्या जीवनछटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 08:20 PM2023-04-15T20:20:54+5:302023-04-15T20:21:22+5:30

Gadchiroli News पारंपरिक पध्दतीने लुगडे-चोळी घालून सहभागी झालेल्या मुली, ढोलताशांवरील रेला नृत्य, डोक्याला मोरपंख लावलेले तरुण, पाहुण्यांच्या स्वागताला बांबू हस्तकलेचे डालगे तसेच साडीचोळी अशा जंगल, पहाडीतल्या जीवनछटांचे प्रतिबिंब आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटले.

Shades of life in the forest emerged in the tribal women's literature meeting | आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटल्या जंगलातल्या जीवनछटा

आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटल्या जंगलातल्या जीवनछटा

googlenewsNext

 

गडचिरोली : पारंपरिक पध्दतीने लुगडे-चोळी घालून सहभागी झालेल्या मुली, ढोलताशांवरील रेला नृत्य, डोक्याला मोरपंख लावलेले तरुण, पाहुण्यांच्या स्वागताला बांबू हस्तकलेचे डालगे तसेच साडीचोळी अशा जंगल, पहाडीतल्या जीवनछटांचे प्रतिबिंब आदिवासी महिला साहित्य संमेलनात उमटले. लोकसाहित्याला आदिवासींच्या संस्कृतीचा साज चढवित उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सारस्वतांच्या मेळ्यात जल, जंगल, जमिनीवरील वाढत्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधून ‘संविधान बचाव’ची हाक देण्यात आली.

शहरात आदिवासींच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनास १५ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांसह शालेय विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. संमेलनाच्या मंचाला ज्येष्ठ समाजसेविका जंगोरायताड यांचे नाव दिले आहे. ज्येष्ठ साहित्यिका नजूबाई गावित यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मेघालयच्या प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार अध्यक्षस्थानी होते, तर माजी आमदार हिरामण वरखडे स्वागताध्यक्ष होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सतीश गोगुलवार, अशोक चौधरी, नंदा भील, रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, साहित्यिका कुसूम आलाम, केशवशहा आत्राम, अशोक श्रीमाली यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलनातून १३ राज्यांतील साहित्यिकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

वेदनांना फुटावी साहित्यातून वाचा

संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासी महिलांचे पहिले साहित्य संमेलन होत आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगितले. आदिवासी साहित्यातून दुर्गम भागातील महिलांच्या वेदनांना वाचा फुटायला हवी. आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन असून, यातून आदिवासींचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचा डाव

आपले संपूर्ण आयुष्य दुर्गम, अतिदुर्गम भागातील घनदाट जंगलात व्यतीत करणारे आदिवासी हेच जंगलाचे खरे हक्कदार आहेत. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव पध्दतशीरपणे आखला जात आहे. लोहखाणींमध्ये बेसुमार उत्खनन सुरू आहे, प्रदूषण वाढत आहे, निसर्गाचे सौंदर्य हिरावले जात आहे. आदिवासींना, ग्रामसभांना न विचारता हे अतिक्रमण सुरू असल्याची खंत साहित्यिका कुसूम आलाम यांनी व्यक्त केली.

 

हिंदी, मराठी, इंग्रजीसह आदिवासी भाषांतून एकतेचा संदेश

या संमेलनात उपस्थित मान्यवरांनी हिंदी, मराठीतून भाषण केले, तर संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी इंग्रजीतून मार्गदर्शन केले. नंतर द्विभाषकाने त्यांचे भाषण मराठीत उपस्थितांसमोर ठेवले. संमेलनात आदिवासी, माडिया या भाषेचा प्रभावदेखील दिसून आला. वृक्ष, वेली, पशु-पक्षी, खळखळ वाहणाऱ्या नद्या, निसर्गाची मुक्त उधळण व त्यातील आदिवासींचे लोकजीवन साहित्यातून प्रतिबिंबित झाले होते.

 

......

Web Title: Shades of life in the forest emerged in the tribal women's literature meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.