शहिदाचे कुटुंबीय सानुग्रह अनुदानापासून वंचित
By admin | Published: December 30, 2016 01:56 AM2016-12-30T01:56:01+5:302016-12-30T01:56:01+5:30
भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे
पत्रकार परिषद : प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा शहीद जवानाच्या पित्याचा आरोप
गडचिरोली : भगवान दादाजी चहांदे शहीद होऊन सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही शासनाच्या वतीने चहांदे कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप शहीद जवानाचे पिता दादाजी चहांदे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला.
शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र शहीद भगवान दादाजी चहांदे यांच्या कुटुंबीयाला अद्यापही सानुग्रह अनुदान मिळाले नाही. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्र व्यवहार व निवेदने सादर करण्यात आली. मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते यांनाही मागील वर्षी निवेदने देण्यात आली होती. मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. क्रिष्णा गजबे, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करून चहांद कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. मात्र दिलेल्या निवेदनांना शासनदरबारी केराची टोपली दाखविण्यात आली काय, असा सवालही दादाजी चहांदे यांनी केला आहे.
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान मिळावे, याकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी शासनाकडे पत्र पाठवून २०१४-१५ या वर्षात सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. परंतु शासन अधिकाऱ्यांच्या पत्राचा विचार करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाविषयी शहीद जवानाच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शासनाला वारंवार पाठविलेल्या निवेदनांचे काय झाले? असा सवाल करीत शासनाने शहीद जवानाचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणीही दादाजी चहांदे यांनी केली. (प्रतिनिधी)