सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान
By admin | Published: June 27, 2016 01:39 AM2016-06-27T01:39:44+5:302016-06-27T01:39:44+5:30
देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित
गडचिरोली : देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराज यांनी केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवारी आयोजित मुख्य सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुरेश डोंगे, क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार नेते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलित उपेक्षीत समाजातील जनतेला आरक्षण लागू केले. विद्यमान शासन या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे. आपला देश सर्वजाती धर्माच्या लोकांनी बनलेला आहे. समाजातील विषमता दूर होऊन समाज एकसंघ बनण्यासाठी तळागाळातील माणसाला विकासात समान संधी दिली पाहिजे, असे यावेळी म्हणाले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजातील विषमता दूर करण्याचे महान कार्य केले. लोकशाहीत शासन व प्रशासनातील यंत्रणेमध्ये समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान राखून काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. या कार्यक्रमापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८ वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात रॅली काढण्यात आली.
या रॅलीत वसंत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लोकांना सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुरेश पेंदाम यांनी केले.